मुंबई - मोदी आणि योगींच्या राजवटीमध्ये बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल असाच लागेल, अशी अपेक्षा होती. तसाच निकाल लागलाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी दिली आहे.
'मोदी-योगींच्या राजवटीत याच निकालाची अपेक्षा' - शरद पवार बाबरी निकाल मत
अयोध्यामधील बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणी तब्बल 28 वर्षांनंतर न्यायालयाने आज निर्णय जाहीर केला. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली, असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
बाबरी विद्ध्वंस प्रकरणाचा आज विशेष न्यायालयात निकाल दिला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यानंतर देशभर भाजपाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. तर देशातील सर्व पुरोगामी संघटनांनी या निकालावर जोरदार आक्षेप घेतला आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देखील आपली थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी सविस्तर माहिती देण्याचे पवारांनी टाळले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील हा निकाल अपेक्षितच असल्याचे म्हटले आहे. आम्हाला निकालाचे आश्चर्य वाटत नाही. बाबरी प्रकरणात न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची सुटका केली. मात्र, अगदी युट्युबवरही गेलात तरी या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, असे मलिक म्हणाले. आम्ही न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो असेही त्यांनी स्पष्ट केले.