महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवार होणार युपीएचे अध्यक्ष? राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी युपीचे अध्यक्षपद स्वीकारून विरोधकांची मोट बांधावी अशीही चर्चा दिल्लीत पुन्हा एकदा रंगू लागली आहे. मात्र, राष्ट्रवादीने हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शरद पवार होणार युपीएचे अध्यक्ष?
शरद पवार होणार युपीएचे अध्यक्ष?

By

Published : Dec 11, 2020, 10:30 AM IST

मुंबई - देशाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष स्थापन करणारे शरद पवार आता युपीएचे (संयुक्त पुरोगामी आघाडी) अध्यक्ष होणार असल्याची चर्चा देशाच्या राजकारण रंगू लागली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील शरद पवारांमध्ये देशाचे नेृत्तव करण्याची क्षमता असल्याचे वक्तव्य केले आहे. यापूर्वीही शरद पवरांनी केंद्रीय पातळीवरती विरोधी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी विविध प्रादेशिक पक्षांनी केली होती. त्याची चर्चा पवार यांच्या राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

विरोधंकांची मागणी ?

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडीवरून सातत्याने चर्चा रंगत आहेत. राहूल गांधी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारायला तयार नाहीत. सध्या सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, सद्य स्थितीत देशात विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही, त्यातच केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यांच्या या नेतृत्वाची दखल घेत काँग्रेसच्या काही नेत्यांसह विरोधकांनी शरद पवार यांनीच युपीएचे नेतृत्व करावे, असे मत मांडले असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे.

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ज्या प्रमाणे पाठिंबा देऊन शरद पवार विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडत आहेत. त्या अनुषंगाने राहुल गांधी हे युपीएचा चेहरा असतील परंतु शरद पवार यांच्या हाती युपीएच्या अध्यक्षपदाची धुरा असेल, असेही बोललं जात आहे. शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. तसेच लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील, असा दावाही केला जात आहे.

महाराष्ट्रातील प्रयोग देशस्तरावरही झाला पाहिजे- राऊत

एकीकडे शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा दिल्लीत रंगत असताना, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील राजकारणात काहीही होऊ शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांमध्ये राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता आहे.त्याच्याकडे दीर्घ अनुभव आहे. भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल, हे मी सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले.

तसेच आम्ही विरोधकांना टक्कर देऊन राज्य चालवत आहोत, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रयोग भविष्यात देशपातळीवर व्हावा, अशी विरोधकांची इच्छा आहे. महाराष्ट्रात प्रयोग झाल्याने अनेकांना तशी अपेक्षा आहे, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

राष्ट्रवादीने फेटाळले वृत्त-

शरद पवार हे युपीएचे अध्यक्षपद स्वीकारणार असल्याच्या राजकीय चर्चांना राष्ट्रवादीने फेटाळून लावले आहे. या सर्व बातम्या निराधार असल्याचं सांगत युपीएमध्ये अशा प्रकारच्या प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे,” असं महेश तपासे यांनी म्हटले आहे. तसेच सध्या देशात केंद्र सरकार विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचा असल्याचा आरोपही तपासे यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details