मुंबई :२ मे रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली. एकदा निर्णय घेतला की तो बदलत नाही, अशी ओळख शरद पवारांची आहे. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे अध्यक्षपदाच्या राजीनामाचा पुनर्विचार होईल का? की पक्षाला नवे अध्यक्ष मिळेल, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली आणि महाराष्ट्र असे दोन अध्यक्ष देण्याचा पवार यांचा विचार असल्याची माहिती आहे. मात्र, शरद पवार यांनी आधीच वारसदार ठरवल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र अजित पवारांकडे सोपवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
जयंत पाटील यांना अध्यक्षपद मिळेल याची खात्री नाही : आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या पण तुम्ही राजीनामा देऊ नका. तुम्ही थांबलात तर आम्ही थांबू, अशा घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर जयंत पाटील यांनी दिल्या. शरद पवारांच्या या निर्णयानंतर हाय होल्टेज ड्रामादेखील पाहायला मिळाला. शरद पवारांच्या या निर्णयानंतर जयंत पाटील ढसाढसा रडले आणि पवारांना राजीनामा मागे घेण्यास विनंती केली. जयंत पाटीलांनी हा हाय होल्टेज ड्रामा मुद्दाम केल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटलांना अध्यक्षपद मिळेल याबाबत शंका व्यक्त होत आहे.