मुंबई- गेल्या महिन्याभरात केंद्र सरकारने गॅस दरात 100 रुपयांनी वाढ केली आहे. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोणत्याही जीवनावश्यक वास्तूमध्ये वाढ करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पंतप्रधानांनी पाळले नाही. उलट गॅसच्या दरात सातत्याने वाढ केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने रविवारी (दि. 27 डिसें.) राज्यभर आंदोलन करण्यात आले.
पुणे- केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ कमी करावी. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवावेत. दरवाढीने महिलांना भगिणीचं आर्थिक बजेट कोसळत आहे. केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे. प्रत्यक्षात तर काहीच करत नाही. आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र, जर गॅस दरवाढ कमी नाही झाली तर यापुढे तीव्र आंदोलन करु, असा इशारा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. हे आंदोलन पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
सोलापूर -गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने सोलापुरातील चार हुत्मात्मा परिसरात रस्त्यावर चूल मांडून अनोखे आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने चुकीचे निर्णय घेत आहे. नोटाबंदी, शेतकरी विरोधी कृषी कायदा किंवा गॅस दरवाढ यासारखे अनेक चुकीचे निर्णय घेत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे या विरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीने हे आंदोलन करून गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.
बीड -केंद्र सरकारने वाढवलेल्या गॅस दरामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत दिलेले गॅस आता पुन्हा भरून घेण्यासाठी गोरगरीब नागरिकांना अधिक पैसे भरावे लागत आहेत. याविरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष माधुरी घुमरे, कमल निंबाळकर यांच्यासह महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी (दि. 27 डिसें.) निदर्शने करत मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
यवतमाळ - गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्या आहेत. या दरवाढीमुळे महिला त्रस्त झाल्या असून रविवार (दि. 27 डिसें.) यवतमाळमध्ये बसस्थानक चौकात चूल पेटवून आंदोलन करण्यात आले.