मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)कडून रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीची चौकशी केली जात आहे. एनसीबीने आज त्याच्या घरावर छापा टाकला. यामध्ये त्याचे ड्रग्स माफियासोबत संबंध होते का? हे तपासले जाणार आहे. तसेच एनसीबीकडून शोविकला ताब्यात घेतले आहे. त्याला एनसीबीच्या कार्यालयात आणले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्तीचे मुंबईतील काही ड्रग्स माफियासोबतचे व्हाट्सअॅप चॅट ईडीकडून जाहीर केले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून याचा तपास केला जात होता. यासंदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून आतापर्यंत दोन ड्रग्स माफियांना अटक करण्यात आली असून यामध्ये जैद कलंत्री व फैजाण नावाच्या आरोपींचा समावेश आहे.
एनसीबीने शोविक चक्रवर्तीला घेतले ताब्यात, घरावरही टाकला छापा
जैदला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता अटक आरोपी जैदसोबत शोविक, रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअलचे काही संबंध आहेत का? याचा तपास एनसीबी करत आहे. त्यासाठी आज शोविक आणि सॅम्युअलच्या घरी छापा टाकला. सध्या सॅम्युअलच्या घरी तपास सुरू असून त्याला एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सॅम्युलला अटक करण्यासाठी एनसीबीकडे पुरावे असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. आता एनसीबीने शोविकला ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती यांच्यासोबत किती वेळा संवाद साधला होता. अंमली पदार्थांच्या खरेदीबद्दल रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती हे किती वेळा ड्रग्स माफियाला भेटले होते? यासंदर्भातील इतर पुरावे शोधण्याचे काम नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून केले जात आहे.