मुंबई -क्रूझ ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडेंवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत आहेत. समीर वानखेडे परिधान करत असलेले कपडे आणि घड्याळांची किंमत ५ ते १० कोटींच्या घरात आहे, असा खळबळजनक आरोप आज मलिक यांनी केला. त्यावर आता समीर वानखेडे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले समीर वानखेडे?
माझ्या महागड्या कपड्यांची केवळ अफवा आहे. मलिक यांनी लोखंडवाला मार्केटमध्ये जावं आणि तिथं कपड्यांचे दर माहिती करुन घ्यावेत. त्यांनी खरी माहिती शोधून काढावी, असा टोला समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे. यासोबतच एका ड्रग पेडलकरनं आपल्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट देखील वानखेडे यांनी यावेळी केला आहे.
हेही वाचा -समीर वानखेडे ७० हजारांचे शर्ट आणि लाखो रुपये किंमतीची पँट वापरतात - नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मंगळवारी गंभीर आरोप केले. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला एक आरोपी आणि वानखेडे यांची बहीण जास्मिन यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मलिकांनी उघड केले आहेत. यामध्ये केससंदर्भात चर्चा केली जात असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.
मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांनीही कबुली दिली आहे. सलमान नावाचा एक ड्रग्ज पेडलर माझ्या बहिणीला भेटल्याचे ते म्हणाले. मात्र, माझी बहीण एनडीपीएसची प्रकरणे लढत नसल्याने तिने त्याला परत पाठवले असेही वानखेडे यांनी स्पष्ट केलं. एका मध्यस्थाच्या माध्यमातून सलमान आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या तुरूंगात आहे असंही वानखेडे यांनी सांगितले.