मुंबई - अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी मोनीश अशोक खामेसेरा या 27 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. मुंबईतील मालाड पश्चिम येथे झालेल्या या कारवाईमध्ये अमली पदार्थांसह एक आलिशान गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
मालाडमध्ये एनसीबीची कारवाई; 22 लाखांचे अमली पदार्थ जप्त
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मालाडमध्ये एक कारवाई केली. या कारवाईमध्ये 22 लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक झाली आहे.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचण्यात आलेला होता. मालाड पश्चिम येथील राजेंद्र विहार सोसायटी जवळील रायन इंटरनॅशनल स्कूल एव्हरशाईन नगर या ठिकाणी सापळा रचला होता. पोलिसांना मोनीश अशोक खामेसेरा हा आरोपी संशयास्पदरीत्या परिसरात फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे173 एल. एस. डी. पेपर डॉट्स मिळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत 17 लाख 30 हजार एवढी आहे. याबरोबरच आरोपीच्या ताब्यातून 37 ग्रॅम एमडी गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत 5 लाख 32 हजार असल्याचे सांगितले जात आहे. हे अमलीपदार्थ आरोपीने त्याच्या जीप कंपास या गाडीमध्ये लपवले होते. पोलिसांनी ही गाडी सुद्धा जप्त केली आहे.