मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून दाऊदचा खास हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंकू पठाण यासह दोघांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईतील एकेकाळचा माफिया म्हणून ओळखल्या जाणार्या करीम लाला याचा नातेवाईक म्हणून चिंकू पठाण याची ओळख आहे. चिंकू पठाण याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून नवी मुंबईतील घणसोली येथून अटक करण्यात आल्यानंतर मुंबईतील डोंगरी परिसरामध्ये छापेमारी करण्यात आली होती.
12 किलो अमली पदार्थ, 2 कोटी 80 लाखांची रोकड जप्त
या धाडी दरम्यान 12 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आलेली असून यामध्ये 6 किलो एमडी व 1 किलो मेंटमाईनसह इतर अमली पदार्थांचा समावेश आहे. बुधवारपासून (दि. 20 जाने.) नवी मुंबई, भिवंडी, डोंगरी परिसरामध्ये केलेल्या कारवाईदरम्यान अमली पदार्थ व तब्बल 2 कोटी 80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरामध्ये एका कारखान्यात या अमली पदार्थांचे उत्पादन घेतले जात होत. एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या चिंकू पठाणकडून मिळालेल्या माहितीवरुन त्याचा जवळचा साथीदार आरिफ भुजवाला याच्या घरी एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली असता इथून मोठ्या प्रमाणात रोकड व आपली पदार्थ मिळून आले आहे. दरम्यान, आरिफ भुजवाला हा फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या विरोधात एनसीबीने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. तर रोहित वर्मा नावाच्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -मुंबईकरांसाठी रेल्वे सुरू करा; खासदार मनोज कोटक यांची मागणी