मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर कुर्ल्यातील खाजगी क्रिटीकेअर रुग्णालयात किडनीवर उपचार अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या संदर्भात क्रिटीकेअर हॉस्पिटलने मुंबई सत्र न्यायालयात रिपोर्ट सादर करत नवाब मलिक NCP leader Nawab Malik यांना रुग्णालयात उपचाराची आता गरज नसल्याचे सांगण्यात आले असल्याने नवाब मलिक यांच्या अडचणीl वाढ झाली आहे.
नवाब मलिक यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ल्यातील कुर्ला येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या उपचाराला ईडीने विरोध दर्शवला होता. तसेच नवाब मलिक यांना आता उपचाराची कुठलीही गरज नसल्याचे ईडीने कोर्टात लेखी अर्जाद्वारे म्हटले होते. आता यावर क्रिटीकेअर हॉस्पिटलने कारागृह प्रशासन आणि मुंबई सत्र न्यायालयातील Bombay Sessions Court विशेष PMLA न्यायालयाला कळवले आहे की, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आणखी हॉस्पिटलायझेशनची गरज नाही.
विशेष न्यायालयाकडे विनंती: नवाब मलिक यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात सांगण्यात आले आहे की, त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी करेपर्यंत त्यांना रुग्णालयात दाखल राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती विशेष न्यायालयाकडे केली आहे. आता या प्रकरणावर 23 डिसेंबर रोजी न्यायालय आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा खाजगी रुग्णालयातील मुक्काम वाढणार की कारागृहामध्ये रवानगी होणार हे स्पष्ट होणार आहे.
सविस्तर अहवाल सादर: नवाब मलिक यांची एक किडनी मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे, तर दुसरी किडनी देखील काही प्रमाणात खराब झाली आहे. त्यामुळे त्यांना दुसरे देखील आजार उद्भवत आहे, असे नवाब मलिक यांच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितले आहे. जे जे रुग्णालयातील डॉक्टर यावर सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर ईडीने केलेली विशेषज्ञ डॉक्टरांच्या टीम गठीत करण्यावरील अर्जावर देखील न्यायालयानंतर निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवाब मलिक यांच्यावर आरोप काय ?हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची 3 एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे.
जमीन कायदेशीर असल्याचा दावा: मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुमारे 5 महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही. त्यामुळं आज न्यायालयात काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण:अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे समोर येताच 'ईडी'ने कारवाई करत मलिक यांना अटक केली होती. मलिक यांनी याआधीही अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा प्रत्येक अर्ज फेटाळण्यात आला आहे. मलिक सुरुवातीला आर्थर रोड कारागृहात होते. मात्र त्यांना मृतपिंडाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णलायात उपचार सुरू आहेत.