कमतरता लपवण्यापेक्षा त्या दुरुस्त कराव्यात, रेल्वेमंत्र्यांच्या वक्तव्याने मजुरांमध्ये संभ्रम - नवाब मलिक
मजुरांना आपल्या राज्यात पाठवताना लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आपली कमतरता लपवण्यापेक्षा ज्या काही कमतरता आहेत, त्या दुरुस्त करण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने करावे. अशा शब्दात नवाब मलिक यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई -मजुरांना आपल्या राज्यात पाठवताना लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आपली कमतरता लपवण्यापेक्षा ज्या काही कमतरता आहेत, त्या दुरुस्त करण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने करावे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना हाच मोलाचा सल्ला असेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रवासी मजुरांना पाठवण्याचा जो प्रोटोकॉल केंद्र सरकारने बनवला होता त्यानुसार नोडल अधिकार्यांची अन्य राज्यातील परवानगी घेऊन मजुरांना रेल्वेने पाठवण्याची व्यवस्था आम्ही करत होतो. रेल्वे मंत्रालयाकडून १५० ट्रेनची पूर्तता होऊ शकत नव्हती. प्रत्येक दिवस १५० गाड्यांची पेंडिग लिस्ट रहात होती आणि आजपण तीच परिस्थिती कायम आहे. मात्र रेल्वे मंत्री पियुष गोयल रेल्वेचा भोंगळ कारभार लपवण्याचा प्रयत्न गेले तीन दिवस कधी ट्विटरवर तर कधी पत्रकार परिषदेतून करत आहेत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
मला वाटतं समस्या भरकटवून सुटणार नाहीत. पियुष गोयल यांच्या अशा वक्तव्यामुळे मजुरांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मजुरांना ज्या ट्रेन उपलब्ध होत आहेत म्हणजे १७०० ट्रेन पाठवण्यात येणार आहेत. त्यापेक्षा जास्त संख्या लोकांची वाढत आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.