मुंबई- काही दिवसांपूर्वी चौकीदार चोर है, अशा वल्गना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ ओकणारे शिवसेना पक्षप्रमुख आता युती करायला निघाले आहेत. त्यामुळे ज्यांना चोर है, असे म्हणणारे उद्धव ठाकरे तुम्ही चोरावर मोर आहात काय ? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केला.
तुम्ही चोरावर मोर आहात का ? नवाब मलिक यांचा उद्धव ठाकरेंना सवाल - भाजप
ज्यांना चोर है, असे म्हणणारे उद्धव ठाकरे तुम्ही चोरावर मोर आहात काय? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केला.
पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर हल्ला झाल्यानंतर ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत १४ फेब्रुवारीला युतीसाठी बैठक घेतल्याने त्यावर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मलिक यांनी ठाकरेंवर टीका करत तुम्ही चोरावर मोर आहात काय? असा सवाल केला आहे.
पुलवामा हल्ल्याचा भाजप आपल्या फायद्यासाठी प्रचार करत असल्याचे सांगत मलिक यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. पुलवामा हल्ला हा देशाच्या अस्मितेवर हल्ला झालेला असताना भाजपचा प्रचार थांबत नाही. त्यासाठी राजकीय फायदा उठवण्याचे काम भाजप करत आहे. तर भाजपला सैन्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता. आता १४ तारखेला युतीसाठी जागा वाटपाची चर्चा करून तुम्ही कुठले लोणी खात होता, असा सवाल मलिक यांनी ठाकरे यांना केला आहे.