मुंबई- केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी असलेले व राज्य सरकारला देणे बंधनकारक असलेले पैसे देण्यात आलेले आहेत. परंतु, कोरोनासारख्या परिस्थितीत जे पॅकेज देणे आवश्यक होते, ते देण्यात आले नाहीत, असे प्रत्युत्तर अल्पसंख्यांक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला आतापर्यंत 28 हजार कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्याला नवाब मलिक यांनी हे प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्राने दीड लाख कोटी रुपयांची कर्ज कशाप्रकारे काढले, असा सवाल दुपारच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी केला होता. त्यावर मलिक म्हणाले की, 'महाराष्ट्राला मागील पाच वर्षात कर्जबाजारी करण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी सक्षम आहोत.'
फडणवीस यांना आर्थिक सल्ला द्यायची इतकीच हौस असेल तर, त्यांनी एखाद्या आर्थिक सल्लागार कंपनी उघडावी. लोक महाराष्ट्रात आणि देशात कर्ज काढण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांचा धंदा चांगल्या प्रकारे चालेल, असा टोलाही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना लगावला.
फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत, आम्ही महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करणार नाही, असे म्हटले होते. यावर, दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत भाजपचे लोक महाराष्ट्रात सरकार पडेल आणि राष्ट्रपती राजवट लागू होईल किंवा आम्ही सरकार बनवणार आहोत, अशा प्रकारचा अफवा पसरत आहेत. परंतु, मी सांगतो की, सरकार आमचे पाच वर्षे टिकेल. भाजपने किती ही अफवा पसरवल्या तर सरकार स्थिर राहील, असे मलिक म्हणाले.
आज राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रातील सरकार हे आमचे नाही असे विधान केले होते. त्यावर, महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि जनतेच्या सेवेसाठी तिनही पक्ष एकत्रितरित्या काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली.