मुंबई:अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मनी लाँड्रींग प्रकरणात जुन्या मालमत्तांच्या व्यवहारांप्रकरणी मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू होती. सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची चौकशी झाली पहाटेच ईडीचे पथक मलिकांच्या घरी धडकले होते. मलिकांनी यापूर्वी अनेकदा ईडीचे अधिकारी आपल्या घरी छापा टाकणार असल्याचे म्हटले होते. कोणत्याही कारवाईचा सुगावा लागल्यानंतर ते जाहीरपणे त्याची उघडणी करतात. परंतु आज अचानकपणे ईडीच्या कार्यालयात नवाब मलिक दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दुपारी 3 नंतर ते बाहेर आले त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे त्याच वेळी त्यांना ईडीने अटक केल्याचे स्पष्ट झाले.
दाऊदच्या मालमत्तेचे व्यवहार रडारवर
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची चर्चा सुरु होतीच. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.
फडणवीसांनी केले होते आरोप
9 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा खळबळजनक खुलासा केला होता. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले होते. या जमिनी मुंबई बाॅंम्ब स्फोटाच्या आरोपींच्या मालकीच्या आहेत. सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांचे निकटवर्तीय सलीम पटेल यांचे नवाब मलिक यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप फडणविसांनी केला होता. या दोघांनी मुंबईतील एलबीएस रोडवरील कोटय़वधींची जमीन मलिक यांच्या नातेवाईकाच्या एका कंपनीला विकल्याचे म्हणले होते.