मुंबई - 'नारायण राणे हे ज्याप्रमाणे वक्तव्य करत आहेत. हे वक्तव्य म्हणजे केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अपमान नाही. तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नारायण राणेंवर कायदेशीर कारवाई होणार आहे', असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
'भाजपचं वातावरण गढूळ करण्याचं काम'
'पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रमाणे वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपाने केले. तिच पद्धत महाराष्ट्रात वापरली जात आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही', असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा काल (23 ऑगस्ट) रायगड जिल्ह्यात आली होती. त्या दरम्यान महाड येथील पत्रकार परिषदेत राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पाहा व्हिडिओ
राणेंविरोधात गुन्हा दाखल
भाजपची जनआशीर्वाद यात्रा काल (23 ऑगस्ट) दक्षिण रायगडमध्ये दाखल झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पाली येथून निघाली. महाड शहरात आल्यानंतर पीजी रेसिडन्सी रिसॉर्टमध्ये नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या थराची टीका करून नारायण राणेंनी गदारोळ माजवला आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आज (24 ऑगस्ट) पहाटे नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहरचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तर, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथेही राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणेंना अटक होणार?
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं चिपळूनला रवाना झाली आहेत. दोन पोलीस निरीक्षकांसह एकूण 15 कर्मचाऱ्यांच्या या पथकांमधे समावेश आहे. पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस तातडीने चिपळूनला रवाना झाले आहेत. नाशिकमधेही राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीसही राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झालेत. जे पथक आधी पोहचेल ते पथक अटकेची कारवाई सुरु करणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -'नारायण राणे "कोंबडी चोर"', मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिवसैनिक संतप्त