मुंबई - येत्या काही तासांत निसर्ग चक्रीवादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. या वादळामुळे मुंबईत पालिका, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, नेव्ही आदी विभाग समुद्रकिनारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत समुद्रकिनारी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळ सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईत येईल अशी शक्यता होती. मात्र, या वादळाची गती कमी झाल्याने हे वादळ आता दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी गरज पडल्यास नौदलाला देखील पाचारण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. याबाबत वरळी-वांद्रे समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी...
निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या दरम्यान अशी घ्या काळजी...
1) मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये.
2) 3 जून रोजी कोणीही आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
3) आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.
4) घराच्या अवती-भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे.
5) आपले पशूधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.
6) आपल्याजवळ केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.