मंडळाचे अध्यक्ष विनायक नामदेव शिवकर मुंबई Navratri Special Story :मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी आणि रोजगारासाठी येत असतात. मुंबईत गणपती सोबतच ओनम, छठ पूजा आणि नवरात्र उत्सव देखील तितक्याच आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरे होतात. दरम्यान, आता नवरात्रौत्सव सुरू असल्यानं आम्ही तुम्हाला तब्बल 80 वर्ष जुन्या एका अशा मंडळाची ओळख करून देणार आहोत जिथं गेल्या 80 वर्षांत गरबा खेळला गेला नाही.
जपली 80 वर्षांची परंपरा :मुंबईतील कोळी समाज हा इथला मूळ निवासी मानला जातो. मुंबईतील कोळीवाडे हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. असाच एक कोळीवाडा म्हणजे सायन कोळीवाडा. याच सायन कोळीवाड्यातील, 'शिव कोळीवाडा आदिवासी भवानी उत्सव मंडळ' या 80 वर्षे जुन्या नवरात्री उत्सव मंडळानं 80 वर्षात तब्बल एकदाही नवरात्र उत्सवात गरबा न खेळण्याची आपली परंपरा जपली आहे. मुंबईत अनेक नवरात्र उत्सव मंडळ आहेत त्यात आता नव्यानं भर म्हणजे 'मराठी दांडिया' हा नवा इव्हेंट सुरू झालाय. मात्र, शिव कोळीवाड्यातील नवरात्र उत्सव वगळता इतर सर्वच ठिकाणी गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो. असंख्य लोक या गरबा खेळात सहभागी होत असतात. मात्र, सायन कोळीवाड्यातील या नवरात्र उत्सव मंडळानं नऊ दिवसात गरबा न खेळता विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्याची परंपरा जोपासली आहे.
1944 साली झाली मंडळाची स्थापना : याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही शिव कोळीवाडा आदिवासी भवानी उत्सव मंडळाचे अध्यक्ष विनायक नामदेव शिवकर यांच्याशी संपर्क साधला. विनायक शिवकर यांनी माहिती दिली की, 'आमच्या मंडळाची स्थापना आपला देश स्वतंत्र व्हायच्या तीन वर्ष आधी म्हणजे 1944 साली झाली. ब्रिटिश काळापासून आपला हा उत्सव सुरू आहे. पूर्वी आमची देवी मूळ सायन कोळीवाडा परिसरात बसायची. आमची जुनी घरं तिथं होती. तिथं आमचा मासेमारी सोबतच मासे विक्रीचादेखील व्यवसाय होता. आमच्या पूर्वजांनी जेव्हा हा नवरात्र उत्सव सुरू केला तेव्हा मूर्तीपूजा न करता देवीचे फोटो किंवा कटआउट लावून तिची पूजा आरती केली जायची. मात्र, मुंबई वाढत गेली आणि बदलत गेली. मग आम्हाला 1963 साली सायन पूर्व इथं सोसायटी मिळाली. त्या काळात मुंबईत गॅंगवॉर, टोळी युद्ध हे जोरात होतं. त्यावेळी पोलिसांनी एक वर्ष आम्हाला नवरात्र उत्सव साजरा करण्यास बंदी घातली होती. तेव्हा या मंडळाचे अध्यक्ष माझे वडील होते. ते एक वर्ष आम्ही आमच्या सोसायटीच्या कार्यालयात देवीची स्थापना केली आणि तिथं उत्सव साजरा केला.'
मंडळाकडून आयोजित करतात सांस्कृतिक कार्यक्रम :विनायक शिवकर यांना ईटीव्ही भारतने गरबा न खेळण्याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'मुंबईत फार पूर्वीपासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे. पण, नवरात्र उत्सवात गरबा खेळणं हे मागच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सुरू झालंय. आमच्या मंडळात आम्ही गरबा न खेळता सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो. मग त्यात आमच्याच मुलांचे डान्स, गाण्यांचे कार्यक्रम, भजन, कीर्तन होतात. पूर्वी तर आमच्या मंडळात आम्ही सर्वजण एकत्र येऊन नाटक बसवत आणि ते सादर करत असू. त्यानंतर आम्ही बाहेरून नाटक मंडळींना बोलवू लागलो. मात्र, आता नाटक मंडळांना जागा आणि स्टेज मोठा लागतो. त्यामुळं नाटक सादर करणं किंवा त्यासाठी बाहेरून कुणाला बोलवणं शक्य होत नाही. मात्र, उत्सवाच्या दिवसात भजन, कीर्तन, लहान मुलांचे कार्यक्रम हे आज देखील सुरू आहेत.'
हेही वाचा -
- Navratri २०२३ : नवरात्र उत्सव मिरवणुकीत ढोल वाजवत मुख्यमंत्र्यांचा सहभाग; पाहा व्हिडिओ
- Navratri २०२३ : अंबा-एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ
- Navratri 2023 : मानाच्या तोफेच्या सलामीनं करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ