हैदराबाद -नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राच्या नवदुर्गा कार्यक्रमात घर से निकलते ही कुछ दूर चलते ही या गाण्याच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आणि सध्या गुगल या बलाढ्य कंपनीच्या इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत असलेल्या मयुरी कांगो यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात त्यांनी अभिनय आणि त्यांनंतरचं त्याचं करिअर तसेच गुगलसारख्या बलाढ्य कंपनीत कार्यरत असतानाची जबाबदारी काय आहे? इतकं मोठं पद सांभाळणे आणि एक गृहिणी अशा दोन्ही भूमिका कशाप्रकारे निभावता, याबाबतही संवाद साधला.
प्रश्न - 17 व्या वर्षी अभिनयात पदार्पण, करिअर बाबत घरच्यांनी दिलेलं स्वातंत्र्य आणि आता गुगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या इंडिया इंडस्ट्री हेड, या प्रवासाबद्दल काय सांगाल?
उत्तर -अनेकदा लोकांना वाटतं की, माझे हे डेस्टिनेशन आहे. तुम्ही गुगलला पोहोचलात किंवा तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये पोहोचलात तर तुमचा प्रवास संपला. मात्र, माझ्यासाठी हा माझ्या प्रवासातील हे वेगवेगळे स्टॉप्स आहेत. पण यावरुन आयुष्य इंटरेस्टिंग आहे, असं म्हणू शकते. वेगवेगळे अनुभव आलेत. त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान मानते आणि मी हे सगळं आईबाबांच्या फार मोठा पाठिंबा असल्यामुळे करू शकले. मला जेव्हा जे करावसं वाटलं त्यासाठी त्यांनी नेहमी पाठिंबा दिला. त्यांनी ही पण शिकवण दिली की, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळतंय, ज्या संधी आहेत, त्या खरंच तुम्हाला हव्या आहेत की नाही, याबाबतही शिकवलं. तुम्हाला आयुष्यात तुम्हाला नेमकं काय करायचंय याबाबत स्पष्टता ठेवण्याबाबत आईबाबांनी शिकवलं. वयाच्या 17व्या वर्षी मी चित्रपट क्षेत्रात आली. महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर इंजीनिअरींग आणि बारावीच्या परीक्षा फार महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यासाठी कोचिंग क्लासेस असतात. पीसीएम वगैरे मध्ये प्रवेश घेण्याइतपत मार्क मिळालेच पाहिजेत, हा दबाव असतो.
पण त्यात जर तुमच्याकडे एखादी संधी आली जी तुम्हाला करावीशी वाटली, जी माझ्यासाठी माझा चित्रपट 'नसीम'च्या रुपात आली. तो चित्रपट मी बारावीच्या पूर्व परिक्षेच्या 21 दिवस आधी केला. आईबाबांनी पाठिंबा दिला. माझे आजी-आजोबा जे स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांना जे वाटतंय की, देशात जे घडतंय, त्या विषयावर हा चित्रपट होता, म्हणून तो चित्रपट मी केला. अभिनेत्री बनायचंय म्हणून नव्हे. माझ्या आईबाबांना याविषयी भान होतं. म्हणून त्यांनी मला हा चित्रपट करू दिला. ते म्हणाले की, तु सेटवर अभ्यास कर. 20-25 दिवसाचे शुटींग आहे. तु करुन घेशील. आम्ही सोबत मदत करायला आहोत. मात्र, ते असे कधीच म्हटले नाहीत की, आता तुला ही संधी मिळाली ना, मग बारावीची परीक्षा नको द्यायला? पण नाही. ते म्हणाले, शुटींग करा, परत या, प्रॅक्टिकल्स करा, परीक्षा द्या आणि शिक्षण पूर्ण करा. माझं स्वप्न होतं की, बारावी करेन, इंजिनीअरींग करेन मग एमबीए करेना आणि कुठल्या तरी कंपनीची सीईओ बनेन.
प्रश्न - तुम्ही तुमच्या करिअरबाबत स्पष्ट होत्या. आजच्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील तरुणाईमध्ये करिअरबाबत संभ्रम आहे. या संवादाच्या निमित्ताने त्यांना काय संदेश द्याल?
उत्तर - वयाच्या 17व्या करिअर निवडणं खरंच कठीण होतं. मी जरी म्हणत असले की, मला एखाद्या कंपनीचं सीईओ व्हायचंय, हे मी कधीतरी कोणती जाहिरात पाहिली असेल, त्यावरुन ठरवलं. त्याला आधार नव्हता. मात्र, कोणत्याही मुलाला 17-18व्या वर्षी निवडणं कठीण आहे. त्यामुळे काही वेळा काही गोष्टी तुम्हाला काय आवडतं. कोणती गोष्ट तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्यासाठी महत्त्वाची वाटते, तुम्हाला आनंदी ठेवते. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तीन चार गोष्टी आहेत, ज्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या समोर ठेवून तुमच्या समोर असलेल्या संधींपैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट निवडू शकता. आताच्या तुलनेत करिअरच्या वाटाही फार आहेत. पण जितक्या करिअरच्या वाटा जितक्या जास्त तितका गोंधळही जास्त होतो. त्यामुळे हे कठीणच आहेत. आईबाबांशी बोलून मित्रपरिवाराशी बोलून तुम्हाला जे सर्वात जास्त आवडतं ते करिअर निवडायला हवं.
प्रश्न - अनेकदा असं होतं की, एखाद्या विशिष्ट विषयातच तुम्हाला करिअर करावं लागेल, याबाबत आईबाबांची सक्ती असते. याबाबत तुमचं मत काय?
उत्तर - हो बरोबर आहे. आईबाबा सक्ती करतात. मुलांनाही ते करावं लागतं. पण आईबाबा असं का करतात याबाबतही विचार व्हायला हवा. कारण जर आपण आपल्या देशाची लोकसंख्या पाहिली, नोकरीच्या संधी पाहिल्या तर खूप कमी असतात आणि प्रत्येकाच्या आईबाबाला वाटतं की, माझा मुलगा किंवा मुलगी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावा, त्याचं भविष्य सुरक्षित असावं म्हणून ते तुम्हाला सांगत असतात. म्हणून राग करण्यापेक्षा, त्यांच्या मताचा अनादर करण्यापेक्षा, त्यांच्या मताला अस्विकार करण्यापेक्षा जर तुमच्याकडे एखादा पर्याय आहे तर त्याबाबत रिसर्च करा. माहिती काढा आणि मग मुद्देसूदपणे आईबाबांसोबत बसून चर्चा करा. त्यानंतरही जर तुमचे आईबाबा तुमच्यावर एखाद्या करिअरबाबत सक्ती करत असेल तर ती बाब वेगळी आहे. कोणतेही आईबाबा तुम्हाला दु:खी करायला नाही सांगत. ते तुमच्या भल्यासाठीच सांगतात.
प्रश्न - तुम्ही गुगल इंडियाच्या हेड ऑफ इंडस्ट्री म्हणून कार्यरत आहात. या पदाबद्दल काय सांगाल?
उत्तर - गुगलला येण्याआधी मी बरीच वर्षे एका जाहिरात संस्थेची प्रमुख (Advertising Agency CEO) म्हणून कार्यरत होती. गुगलचा जाहिरात विभागाचा जो बिझनेस आहे, मी तो पाहते. गुगल ज्या एजन्सीच्या माध्यमातून विकत घेतले जाते, उदा. प्रिंट, टीव्ही, डिजीटल त्यांच्यासोबत असलेली गुगलची रिलेशनशीप ती कशी मॅनेज करावी, त्यांना गुगलच्या प्रॉडक्ट्सबाबत समजावणं, ते कसे वापरले पाहिजेत, तसेच कशाप्रकारे त्यांचा त्यांच्या ग्राहकांना फायदा होऊ शकतो, हे समजावणं माझं काम आहे.
प्रश्न - तुम्ही जाहिरातीचा मुद्दा उपस्थित केलात. सध्या डिजिटल माध्यमांचं युग आहे. जाहिरातीमध्ये बराच बदल झाला आहे. आधीची आणि आताची परिस्थिती काय बदल झाला आहे?