मुंबई : Navratri २०२३: नवरात्रीत भव्य दुर्गापूजेचं (Navratri 2023) आयोजन करण्याबरोबरच गरबा आणि दांडिया खेळण्याचाही ट्रेंड आहे. विशेषता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गरबा आणि दांडिया नृत्य गुजरातच्या रस्त्यांवर तसेच इतरत्र देखील सर्रास पाहायला मिळते. मुंबईसह राज्यात तरूणाई मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आनंद साजरा करतात. याबाबत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील सर्व सण-उत्सव अतिशय धुमधडाक्यात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवादरम्यान कोणालाही कोणताही अडचणी येऊ नये, यासाठी राज्य सरकारच्यावतीनं सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. स्थानिक महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबतच्या सुचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी: मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात दांडियाचं आयोजन (Garba Dandiya) करण्यात येते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. अशा वेळेस नागरिकांच्या आरोग्याची, सुरक्षेची सर्व काळजी सरकारनं घेतली आहे. मात्र, नागरिकांनी स्वतःही काळजी घ्यायला हवी. अनोळखी व्यक्तींना आपला संपर्क क्रमांक देवू नये, त्यांच्याकडील अन्न पदार्थ खावू नयेत, अशा सुचनाही देण्यात आल्याचं लोढा यांनी सांगितलं.