नवी मुंबई : नवी मुंबईत अखेर जिल्हा सत्र न्यायालयाची सुरवात झाली आहे. गेल्या 14 वर्षांपासून वकील बार असोसिएशनच्या माध्यमातून ही मागणी केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून, नागरिकांची व वकिलांची ठाण्याला जाण्याची पायपीट वाचली आहे. विशेष म्हणजे देशातील पहिले पेपरलेस न्यायालय नवी मुंबईत सुरू करण्यात आले आहे.
नवी मुंबईकरांना मोठा फायदा : नवी मुंबईत जिल्हा सत्र न्यायालय प्रत्यक्ष सुरवात झाल्याने याचा मोठा फायदा नवी मुंबईकरांना होणार आहे. कारण ५ लाखांच्या वरील आर्थिक गुन्हे, गंभीर गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी नवी मुंबईतील नागरिकांना ठाणे जिल्हा न्यायालयात गाठावे लागत होते. मात्र आता नवी मुंबईतच सुरवात झाल्याने येथील वकील वर्गाला सुध्दा दिलासा मिळाला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. पटेल आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या न्यायालयाचे कामकाज पेपरलेस होणार असल्याने हे देशातील पहिले पेपरलेस न्यायालय असणार आहे. तसेच न्यायालयात डिजिटल कामकाज चालणार असल्याने, हे न्यायालय राज्यातील व देशातील पहिले डिजिटल न्यायालय ठरणार असल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे.