नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी शुक्रवारी सिडकोच्या कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अनोखा तिरडी मोर्चा काढला. यावेळी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तिरडी बनवून सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला. या तिरडी मोर्चात शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचा तिरडी मोर्चा
१६० हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावीत नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली. रस्ते व इतर गोष्टी वगळता फक्त 16 टक्के प्लॉटची जागा विमानातळ बधितांना मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी कोबंडभुजे, तरघर, वाघिवली, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा, गणेशपुरी या दहा गावांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
सिडकोने आम्हाला निव्वळ आश्वासन दिली. आम्हाला आमच्या जागेतून हलवले, अश्या प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त व्यक्त करीत आहेत. विमानतळाच्या भरावामुळे पावसाळ्यात डुंगी पारगाव व इतर विस्थापित न झालेली गावे पाण्याखाली जात आहेत. अखिल भारतीय किसान सभा, नांदाईमाता चार गाव संघर्ष समिती, जय हनुमान कराडी कोळी मच्छीमार संघटना यांच्या माध्यमातून हा तिरडी मोर्चा काढण्यात आला होता.
काय आहेत विमानतळ बाधितांच्या मागण्या..
- प्रकल्पग्रस्तांच्या घरावर चालविलेल्या तोडकामास विरोध.
- मच्छीमारांच्या लढ्यातून मान्य झालेल्या मच्छीमारांच्या पुनर्वसनाची तातडीने अंमलबजावणी करणे.
- बांधकाम खर्च १००० वरून २५०० करणे.
- प्रकल्पग्रस्तांना विमानतळ प्रकल्पात कायमस्वरूपी नोकऱ्या देणे.
- विमानतळ भरवामुळे डुंगी पारगाव, भंगारपाडा व ज्या गावात पाणी शिरते त्या गावांचे पुनर्वसन पॅकेज लागू करणे आणि मच्छीमारांना नुकसान भरपाई देणे.
- १२.५% चे प्रलंबित प्रश्न सिडकोने तातडीने सोडवावे.
- शुन्य पात्रता पद्धत बंद करून प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक बांधकामांस तिप्पट क्षेत्र नुकसान भरपाईचा लाभ देण्यात यावा.