मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग थांबले आहे. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लोकांना एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचा मोठा फटका नाट्यकलेलादेखील बसलेला आहे. अशात रंगकर्मी आणि रंगमंच कलाकार यांच्या मदतीसाठी काही नाट्य निर्माते आणि कलाकारांनी स्वतः हून पुढाकार घेत त्यांना आर्थिक मदत देऊ केली.
रंगकर्मींच्या मदतीसाठी दहा कोटींचा निधी, नाट्य परिषदेचा निर्णय
लॉकडाऊन जरी 3 मे रोजी संपत असला तरीही व्यावसायिक नाटकांचे प्रयोग व्हायला अजून किती वेळ लागेल ते सांगता येणे अवघड आहे. हा वेळ अजून वाढल्यास नाट्य व्यवसायावर मोठे संकट येऊ शकते. गेल्या महिन्याभरात एकही प्रयोग झाला नसल्याने साधारण 25 कोटींचे नुकसान झाले आहे. हे निर्बंध असेच कायम राहिले तर हा आकडा वाढून 100 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन जरी 3 मे रोजी संपत असला तरीही व्यावसायिक नाटकांचे प्रयोग व्हायला अजून किती वेळ लागेल ते सांगता येणे अवघड आहे. हा वेळ अजून वाढल्यास नाट्य व्यवसायावर मोठे संकट येऊ शकते. गेल्या महिन्याभरात एकही प्रयोग झाला नसल्याने साधारण 25 कोटींचे नुकसान झाले आहे. हे निर्बंध असेच कायम राहिले तर हा आकडा वाढून 100 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी नुकतीच नाट्यकर्मींची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने एक बैठक अॅपद्वारे घेतली. यात रंगकर्मीं, नाट्य निर्माते, रंगमंच कामगार यांच्यासह नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, रंगकर्मीं, नाट्य निर्माते आणि रंगमंच कामगार यांना मदत करण्यासाठी नाट्य परिषदेतर्फे 10 कोटी रुपयांचा 'रंगकर्मी मदत निधी' उभारण्यात येणार आहे. याशिवाय नाट्य निर्माते, रंगकर्मी आणि रंगमंच कामगार यांना तातडीची मदत मिळावी यासाठी 50 लाखांचा निधी देण्याची घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली आहे. तर, नाट्य व्यवसाय पुन्हा एकदा सुरू व्हावा यासाठी प्रेक्षकांच्या साथीने प्रयत्न करणार असल्याचे ठरवले गेले आहे. या कठीण काळातून मार्ग काढून व्यावसायिक मराठी रंगभूमी पुन्हा नवी भरारी घेईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.