मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. शरद पवार यांनी आपला राजकीय संन्यास जाहीर केल्याने पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना कशी केली? त्यांचे काँग्रेसमधील वाद आणि पुन्हा काँग्रेस सोबतच युती करण्यामागची कारण? हे चर्चेला आलं आहे. शरद पवार यांना देशातील अनेक येथे आपल्या गुरुस्थानी मानतात. अगदी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर रित्या शरद पवार आपले गुरु असल्याचं म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपण शरद पवारांच बोट पकडूनच राजकारणात आलो असे एका कार्यक्रमात म्हटलं होतं.
1999 साली राष्ट्रवादीची स्थापना :आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन जवळपास 20 वर्ष उलटले आहेत. या वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या. ज्याप्रमाणे देशातील राजकीय वातावरण बदलले त्याप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले. राष्ट्रवादीच्या सध्याच्या स्थितीवर येण्याआधी राष्ट्रवादीचा इतिहास जाणून घेणे सर्वात महत्त्वाचा आहे. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापना करण्यात आली. यामध्ये यामागे मोठ्या राजकीय घडामोडी होत्या.
पवार आणि काँग्रेस सोबत असलेले मतभेद :शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेस मधून सुरुवात झाली. पण, 1999 मध्ये, राजीव गांधी यांच्याशी असलेले मतभेद व राजकीय कोंडीमुळे त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पासून वेगळे होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष बनले. काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री तसेच लोकसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. 20 वर्षांपूर्वी काँग्रेसमधील नेतृत्वाच्या वादावरून शरद पवार यांनी मेघालयातील काँग्रेस नेते पीए संगमा आणि बिहारचे तारिक अन्वर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यापैकी पवार आणि संगमा 2004 मध्ये वेगळे झाले.
पक्षाची स्थापना आणि उद्दिष्टे :जाणकार सांगतात, 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हा त्यांना स्वतःकडून खूप आशा होत्या. त्यावेळी जवळपास 10 वर्ष काँग्रेसचा वाईट काळ सुरू होता. तेव्हा पवार, संगमा व तारिक अन्वर या तिघांना काँग्रेसमधील इतर अनेक लोक व नेते देखील साथ देतील अशी आशा होती. याशिवाय कोणत्याही पक्षाला जेव्हा स्पष्ट बहुमत मिळणार नाही, तेव्हा राष्ट्रवादी पक्ष अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा या तीन नेत्यांना विश्वास होता. पण, त्या काळात या नव्या पक्षाला ना काँग्रेसचा पाठिंबा मिळाला ना राष्ट्रीय राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावण्याची संधी मिळाली. 1999 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले होते.
राजकीय विश्लेषक काय सांगतात? :शरद पवार यांची राजकीय कारकीर्द जवळून पाहिलेले व राष्ट्रवादी काँग्रेसचे मागील 20 वर्षाची वाटचाल जवळून पाहणारे जेष्ठ पत्रकार संजय आवटे सांगतात की, "शरद पवारांनी १० जून १९९९ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा 'शरद पवार' या चेह-याशिवाय या नवजात पक्षाकडे काही नव्हते. सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून कॉंग्रेस सोडणा-या पवारांचे तेव्हा आडाखे वेगळे होते. कॉंग्रेस तेव्हा सत्तेत नव्हती. आघाडी सरकारांचे पर्व सुरू होते. राजकारणात नवख्या असलेल्या सोनियांना फार काही जमेल, असे पवारांसह अनेकांना वाटत नव्हते. त्यामुळे प्रादेशिक पक्ष स्थापन करून स्वतःचे स्थान मजबूत करत न्यायचे, असा होरा पवारांचा होता. देशाने तोवर एच.डी. देवेगौडांसारखे पंतप्रधान पाहिले होते. पवारांचा दावा तर त्याहून नक्कीच मोठा होता. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले शरद पवार बाहेर पडले, तेव्हा असे चित्र होते."
'व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेशिवाय पवारांची तेव्हा काही भूमिका नव्हती. शरद पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर भलेभले त्यांना 'जॉइन' झाले. कॉंग्रेसने सत्ता गमावलेली होती. पुन्हा येण्याची शक्यता नव्हती. सोनियांच्या नेतृत्वाविषयी शंका होती. शिवाय, सोनियांशी 'ॲक्सेस' नव्हता. 'शरद पवार' या नावाचा दबदबा राज्यात तरी त्याहून मोठा होता. स्थानिक हितसंबंध आणि अस्तित्वाचे प्रश्न असल्याने ठिकठिकाणचे सरदार एकवटले. त्यातून हा पक्ष उभा राहिला. अनेकांचे अंदाज खोटे ठरले आणि २००४मध्ये सोनियांनी कॉंग्रेसला जिंकून दिले. केंद्रात कॉंग्रेसची आघाडी सत्तेत आली. त्यामुळे सोनियांच्या नेतृत्वाखालीच पुढे पवारांना केंद्रात दहा वर्षे काम करावे लागले. अर्थात, त्यापूर्वी १९९९च्या विधानसभा निवडणुकीनंतरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात एकत्र आले. जन्मापासून सत्तेत असणारा हा पक्ष वाढत गेला. राज्यातला अत्यंत महत्त्वाचा पक्ष झाला. २००४च्या निवडणुकीत तर तो राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला.'
'हे कर्तृत्व शरद पवारांचे आपल्या प्रतिमेच्या आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या बळावर त्यांनी राज्यभरात हा पक्ष पोहोचवला. शरद पवार नावाची जादू उत्तरोत्तर वाढत गेली. तरूणांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने या पक्षासोबत आल्या. केडर तयार झाले. २०१४पर्यंत असे सगळे ठीक चालले होते.'
ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सांगतात, '२०१४च्या लोकसभा निवडणुकीने सगळे संदर्भच बदलून टाकले. जन्मापासून सत्तेचा चमचा तोंडात असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेतून बाहेर गेली. देशात कॉंग्रेसची वाताहत झाली. राज्यातही स्थिती बिकट झाली. तरीही नव्या राजकारणात 'रिलिव्हंट' राहण्याचा प्रयत्न पवार करत राहिले. त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या दुर्दैवी कालखंडाने पवारांना बरेच काही शिकवले आहे. ज्या इंदिरा गांधींना यशवंतरावांनी विरोध केला, त्या इंदिरा पुन्हा सत्तेत आल्या आणि यशवंतरावांचे राजकीय करीअरच संपुष्टात आले. सोनियांना विरोध करणा-या पवारांचे असे झाले नाही, यात सोनियांकडे असलेले कमी राजकीय भांडवल आणि सोनियांचा चांगुलपणा ही कारणे आहेतच. पण, पवारांचे सावधपणही आहे. संदर्भ कितीही बदलोत, आपण 'रिलिव्हंट' राहायचे हे पवारांना नीट कळलेले आहे.'
कॉंग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला आव्हान देऊन स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर कर्करोगासारख्या असाध्य आजाराने गाठूनही उभे राहिलेले पवार हे रसायन अजिबातच सामान्य नाही. तरीही, २०१९च्या लोकसभा निवडणुकीने चित्र बदलले. शरद पवार संपल्याच्या चर्चांना उधाण आले. पवारांना सोडून लोक भाजपमध्ये जाऊ लागले. त्याही स्थितीत पवार डगमगले नाहीत. ते बाहेर पडले. 'इडी'वर चालून गेले. पावसात भिजले. अशक्य ते पवारांनी करून दाखवले.