मुंबई- राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने वेग घेतला असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आणि नेत्यांची एक तातडीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. या बैठकीत भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांना कधी पक्षात घ्यायचे यावर बरीच चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षबांधणीबाबत बैठक घेतली. यात एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. मागील दोन दिवसांपासून खडसे मुंबईत असून त्या पार्श्वभूमीवर हा विषय चर्चिला गेला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसोबत शरद पवार यांनी आढावा बैठक घेतली. मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार कायद्यावर प्रत्येकाची मते काय आहेत, ती जाणून घेतली. काँग्रेस राज्यात या दोन्ही कायद्यांना विरोध करत असताना राष्ट्रवादीची भूमिका काय असली पाहिजे, यावर चर्चा झाली. कोरोनाबाबत तपासण्या राज्यात होत आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे, हे खरे असले तरी सातत्य टिकवण्याचे काम करावे लागेल, ते सरकार म्हणून सुरू आहे.
हेही वाचा -ग्रंथालयांची कवाडे उघडा; राज ठाकरेंचा मंत्री उदय सामंतांना फोन
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यावर शेतकरी संघटनांचे मत जाणून घेतले. सगळ्या शेतकरी नेत्यांची वेगवेगळी मते आहेत. ज्या त्रुटी आहेत त्यात राज्य सरकारने बदल केला त्याबाबत चर्चा झाली, असल्याची माहिती दिली. त्यासोबतच राज्यात शाळा दिवाळीपूर्वी सुरू होणार नाही, दिवाळीनंतर त्यासाठीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच जीएसटीची बैठक झाली, मला हजर राहता आले नाही, जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. पुन्हा १२ किंवा १३ तारखेला बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कोण काय बोललं हे अजूनही ऐकलेले नाही मला ते ऐकू द्या त्यानंतर या विषयावर बोलणे योग्य ठरेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची बिहार निवडणुकीमध्ये गट बंधनाच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक जागा मिळत नसल्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत. बिहारमध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. आमच्याकडे उमेदवारदेखील मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आपली पुढील दिशा ठरवणार आहे.
खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी आग्रही आहे, आज मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मराठा नेत्यांशी चर्चा करत आहेत, तोडगा निघेल असे वाटते. दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलून शरद पवार आपली भूमिका बोलतील.