मुंबई - सध्या नोकऱ्या मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. बेरोजगार राहून दिवस काढण्यापेक्षा स्वतःचे उद्योग सुरु करावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. असाच एक प्रयत्न अनुसूचित जाती जमातीमधील बेरोजगार युवकांना स्वतःचे व्यवसाय सुरु करता यावेत यासाठी केला जात आहे. यासाठी केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी उद्या सोमवारी २३ जानेवारीला एका कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
कोटींहून अधिक लोकांना रोजगार - रोजगार निर्मिती आणि आजीविका सुधारण्यात केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे एमएसएमई क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या क्षेत्रामध्ये ११ कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणारी ६ कोटींहून अधिक युनिट्स आहेत. जीडीपीमध्ये जवळपास ३० टक्के योगदान आणि भारतातून एकूण निर्यातीच्या ४५ टक्य्यांपेक्षा पेक्षा जास्त आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. शाश्वत विकासासाठी जागतिक मूल्य श्रृंखलेत एम.एस. एम. इ'चे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे.
कॉन्क्लेव्हचे आयोजन -महाराष्ट्र्रात २५ लाख एस.एम. इ नोंदणीकृत आहेत. मात्र त्यात एस.सी, एस टी समाजातील खूपच कमी आहे. उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एनएसएसएच योजना आणि मंत्रालयाच्या इतर योजनांबद्दल राज्यात जागरूकता निर्माण केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या सोमवारी कफ परेड येथील जागतिक व्यापार केंद्रामध्ये राष्ट्रीय एससी - एसटी हब कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. यांचे उदघाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे करणार असल्याची माहिती एनएससीआयचे विभागीय उपाध्यक्ष मनोज कुमार सिंग यांनी दिली.