मुंबई National Games 2023 :गोव्यात उद्या २६ ऑक्टोबरपासून ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होईल.
राज्याचा खेळ ध्वज तुकडीकडे सुपूर्द : या स्पर्धेपूर्वी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या ११०० जणांच्या तुकडीची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्याचा खेळ ध्वज या तुकडीकडे सुपूर्द केला. गोव्यात २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत या खेळांचं आयोजन केलं जाणार आहे. २०२२ मध्ये ही स्पर्धा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती.
पाच शहरांमध्ये स्पर्धेचं आयोजन : राष्ट्रीय खेळ गोव्यातील म्हापसा, मडगाव, पणजी, पोंडा आणि वास्को या पाच शहरांमध्ये होणार आहेत. गोवा प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. गोव्याला यापूर्वी ३६ व्या राष्ट्रीय खेळांचे यजमान हक्क बहाल करण्यात आले होते. ही स्पर्धा २०१६ साली नियोजित होती. मात्र काही कारणांमुळे तिला अनेकवेळा पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर गेल्या वर्षी गुजरातनं या स्पर्धेचं आयोजन केलं. आता गोव्यात होणारी स्पर्धा राष्ट्रीय खेळांची ३७ वी आवृत्ती असेल, ज्यामध्ये अंदाजे १०,००० खेळाडू ४३ क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतील.
खेळांचं थेट प्रक्षेपण होणार : गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय खेळांबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, २६ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी संध्याकाळपर्यंत येथे पोहचतील. मी सर्व निरीक्षण करत आहे. आज मी स्पोर्ट्स व्हिलेजमध्येही गेलो होतो. आम्ही या खेळांचं थेट प्रक्षेपण करणार आहोत. २.५ लाखांहून अधिक लोक हे प्रक्षेपण पाहतील, असं त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
- PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा, शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेणार; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
- Glenn Maxwell : दिल्लीत आलं 'मॅक्सवेल' नावाचं तुफान! विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकलं
- Shubman Gill : शुभमन गिल लवकरच बनेल जगातील नंबर १ फलंदाज, ICC ची ताजी क्रमवारी जाहीर