मुंबई -परळ भागातील झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारे याला यंदाचा (वर्ष 2019) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. देशाच्या 12 राज्यातील 22 बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांचा समावेश आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष गीता सिद्धार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दहा वर्षीय झेनने वाचवले होते १७ जणांचे प्राण -
मुंबईच्या परळ भागातील राहत्या इमारतीत आग लागून झालेल्या घटनेत झेन सदावर्ते या 10 वर्षाच्या मुलीने 17 जणांचे प्राण वाचविले. झेन राहत असलेल्या 17 मजल्यांच्या इमारतीला अचानक आग लागली होती. 16 व्या मजल्यावर राहणाऱ्या झेनच्या कुटुंबीयांना आग लागल्याचे कळताच तिच्या आई-वडिलांनी तिला झोपेतून उठवले. झेनने स्वयंपाकघराची खिडकी उघडताच संपूर्ण घरात धूर पसरला अशातच शेजारून काही लोकांनी दिलेल्या ‘वाचवा- वाचवा’च्या आरोळया तिच्या कानावर पडताच ती घराबाहेर आली आणि आवाजाच्या दिशेने धावली. आगीच्या विळख्यात सापडलेल्या या लोकांना धीर देत झेनने सुरक्षितस्थळी सर्वांना हलविले. यावेळी तिने या मजल्यावरील विजेचा मुख्य बटन बंद केले व अग्नीशमन दलालाही फोन केला.
दरम्यान, आपत्ती काळात स्वसंरक्षणासाठी शाळेत शिकविलेले उपाय प्रत्यक्षात आणत झेनने या सर्वांना आपल्याकडील विशिष्ट मास्क दिले व एकाच ठिकाणी सर्वांना खाली बसविले. यानंतर अग्नीशमन दलाची गाडी येवून झेनसह आगीत अडकलेल्या 17 जणांना सुरक्षित बाहेर काढले. झेनच्या प्रसंगावधानाने व धाडसामुळे 17 जणांचे प्राण वाचले तिच्या या साहसाकरिता ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार ‘जाहीर झाला आहे.