मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या काही दिवसांपूर्वी शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध नसल्यास तो लैंगिक अत्याचार ठरणार नाही, असा निर्णय दिल्यानंतर या संदर्भात मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सुनावणीदरम्यान हा निकाल देण्यात आलेला होता. हा निकाल देणाऱ्या नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशांच्या विरोधात 13 वर्षाच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या झेन सदावर्ते या मुलीने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवून न्यायमूर्ती पुष्पा गनेदीवाला यांना न्यायाधीश पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - 'मियावाकी' प्रकारची शहरी वने राज्यातील प्रत्येक शहरांत व्हावीत- आदित्य ठाकरे
काय म्हटले आहे झेननने तिच्या पत्रात
13 वर्षाच्या झेन सदावर्ते हिने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आर्टिकल 21 च्या अंतर्गत देण्यात आलेला हा निर्णय मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे. यामुळे न्यायाधीश पुष्पा गनेदीवाला यांना यानंतर न्यायालयीन व्यवस्थेचा भाग बनवू नये. भारताच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र, अशा प्रकारच्या निर्णयांमुळे सामान्य जनांचा विश्वास राहणार नाही.
कोण आहे झेन सदवर्ते
13 वर्षाच्या झेन सदावर्ते हिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2020 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. मुंबईतील परळ परिसरामध्ये ती राहत असलेल्या इमारतीला आग लागल्यानंतर तिने दाखवलेल्या साहसामुळे 17 लोकांचा जीव वाचला होता. 21 ऑगस्ट 2018 मध्ये परेल येथील क्रिस्टल टॉवर या 13 मजली इमारतीला आग लागली होती. याच इमारतीत झेन सदावर्ते राहत होती. आग लागल्यानंतर इमारतीत अडकलेल्या 17 जणांना आगीच्या धुरापासून वाचवण्यासाठी तिने ओला सुती कपडा चेहऱ्यावर बांधण्यास सांगितलेला होत. यामुळे शरीरामध्ये कार्बन न जाता स्वच्छ हवा शरीरास मिळेल, असे तिने त्या लोकांना सांगितले होते. यामुळे 17 जण सुरक्षित इमारतीबाहेर आले होते.
हेही वाचा -कोकणातील प्रवाशांसाठी खुशखबर; आठवड्यातून पाच दिवस धावणार जनशताब्दी एक्सप्रेस