मुंबई Naresh Goyal News :जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना सक्त वसुली संचालनालयानं बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणात कोठडी सुनावलेली आहे. ते सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, शनिवारी (6 जानेवारी) विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर गोयल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी नरेश गोयल भावूक झाले.
हात जोडून केली विनंती : कोर्टाच्या दैनंदिन सुनावणीच्या नोंदीनुसार, नरेश गोयल न्यायालयात हात जोडून म्हणाले की, तब्येत खूप खालावलीय. तसंच पत्नी आजारपणामुळं अंथरुणाला खिळली आहे. पत्नीचा कर्करोग शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला मुलगीही आजारी आहे. तसंच तुरुंगातील कर्मचार्यांनादेखील मदत करण्यावर मर्यादा आहेत.
न्यायाधीशांनी हे दिले निर्देश :न्यायाधीश म्हणाले की, 'नरेश गोयलने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही विचार केलाय. मी आरोपीला आश्वासन दिलंय की त्यांना निराधार सोडलं जाणार नाही. तसंच त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल. त्यावर उपचार केले जातील, असं ते म्हणाले. दरम्यान, न्यायालयानं नरेश गोयलच्या वकिलांना त्यांच्या प्रकृतीबाबत योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश दिले.
- गेल्या महिन्यात गोयल यांनी जामीन अर्जात हृदय, प्रोस्टेट, हाडे इत्यादी विविध आजारांचा उल्लेख केला होता. ईडीने त्यांच्या याचिकेवर उत्तर दाखल केलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे.
काय प्रकरण आहे : नरेश गोयल यांच्यावर कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकेच्या तक्रारीवरून मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. कॅनरा बँकेनं जेट एअरवेज लिमिटेडला क्रेडिट मर्यादा आणि 848 कोटी 86 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केल्याचं सांगण्यात आलं. त्यापैकी 538 कोटी 62 लाख रुपये थकबाकी आहेत. या तक्रारीनंतर सीबीआयनं मे 2023 मध्ये नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता आणि इतरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 5 मे रोजी नरेश गोयल यांच्या मुंबईतील कार्यालयासह 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर 19 जुलैला ईडीनं त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला. अखेर 1 सप्टेंबर 2023 रोजी नरेश गोयल यांना ईडीनं अटक केली.
हेही वाचा -
- कॅनडा बँक फसवणूक प्रकरण: नरेश गोयल यांच्या पत्नीला दिलासा, पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर
- Naresh Goyal : नरेश गोयल यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- Naresh Goyal News: नरेश गोयल यांची ५३८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त, ईडीनं आरोपपत्रात जेट एअरवेज बंद पडण्याचं सांगितलं कारण