मुंबई- ईडीनं विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं की, नरेश गोयल यांनी स्वत:च्या फायद्यासाठी निधी वळविला नसता तर विमान कंपनी तग शकली असती. मात्र, गोयल यांनी कंपनीचा निधी भारत आणि विदेशातील कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात वळता केल्याचं ईडीनं आरोपपत्रात म्हटलं. दुसरीकडं ईडीने बुधवारी जेट एअरवेजचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांच्यावर मोठी कारवाई केली. नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांची लंडन, दुबई आणि देशातील विविध राज्यांतील ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर बँकांची फसवणूक आणि मनी लाँडरिंगचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं मंगळवारी आरोपपत्र दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मालमत्ता जप्तीची कारवाई केली. ईडीनं जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये 17 निवासी सदनिका आणि बंगल्यांचा समावेश आहे. गोयल आणि त्यांचा मुलगा निवान गोयल यांच्या लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमध्ये कंपन्या आहेत, असं ईडीनं म्हटले. ईडीनं नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि त्यांच्या चार कंपन्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेते. या संदर्भात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बुधवारी सुनावणी दरम्यान घेतली.
काय म्हटलं आहे ईडीच्या आरोपपत्रात?विमान इंधनाच्या वाढलेल्या किमती, देशातील कर, विमानतळ शुल्क, विमान कंपन्यांमधील स्पर्धेमुळे बदलणारे विमानाचे दर या कारणाने विमान कंपनी बंद करण्यात आल्याचा दावा गोयल यांनी केला. हा दावा ईडीनं खोडून काढला आहे. ईडीनं आरोपपत्रात म्हटलं की जेट एअरवेज ( जेआयएल ) कंपनीच्या आर्थिक नुकसानीमागे अधिकाऱ्यांनी कामकाज चालविताना घेतलेले चुकीचे निर्णय आहेत. तसचं गोयल यांनी वैयक्तिक आर्थिक लाभासाठी कंपनीचा निधी वापर केल्यानं जेट एअरवेज कंपनीची पडझड झाली. वायफळ खर्च आणि कर्ज वाढत असताना कंपनीचे पुनर्भांडवलीकरण आवश्यक होते.
ईडीकडून गोयल यांच्या संपत्तीचा शोध सुरू -टाटा, टीपीजी (खाजगी इक्विटी) तसेच एतिहाद या कंपन्यांनी जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, त्यामुळे हिस्सा कमी होणार असल्यानं नरेश गोयल त्यासाठी इच्छुक नव्हते, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला. ईडीच्या आरोपपत्रानुसार जेआयल कंपनीला कोणतेही योगदान न देता गोयल आणि त्यांचे कुटुंब आलिशान जीवन जगत आहेत. नरेश गोयल यांनी विदेशी ट्रस्ट तयार केले आहेत. तसेच विदेशात महागडी मालमत्ता घेतली आहे. तपासादरम्यान नरेश गोयल हे ईडीच्या तपासाला असहकार आणि टाळाटाळ करत असल्याचंही ईडीनं म्हटले. ईडीकडून गोयल यांच्या संपत्तीचा शोध सुरू आहे. जेट एअरवेज, गोयल, त्यांची पत्नी अनिता आणि 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयनं यापूर्वीच विमान कंपनीच्या काही माजी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा-
- Naresh Goyal : नरेश गोयल विरोधात ईडीचे आरोपपत्र दाखल
- Naresh Goyal Case : जेटच्या नरेश गोयल यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, जामिनासाठी याचिका दाखल