मुंबई Narendra Modi : शनिवारी (१४ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राला संबोधित केलं. यावेळी बोलताना, ऑलिम्पिकचं आयोजन करणं हे १४० कोटी भारतीयांचं स्वप्न असल्याचं ते म्हणाले.
ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी उत्सुक : 'भारत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक आहे. २०३६ मध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित केली जावी यासाठी प्रयत्न करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही', असं मोदी म्हणाले. 'भारतानं अलीकडच्या काळात आपल्यात जागतिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्याची क्षमता असल्याचं सिद्ध केलंय. आयओसीचं सत्र ४० वर्षांनंतर भारतात होत आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आम्ही २०३६ ऑलिम्पिकपूर्वी २०२९ च्या युवा ऑलिम्पिकचंही आयोजन करण्यासाठी इच्छुक आहे. मला विश्वास आहे की भारताला IOC कडून सतत पाठिंबा मिळेल', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयओसीनं घेतलेल्या पुढाकाराचंही त्यांनी स्वागत केलं.
भारत एक प्रेरणादायी ठिकाण आहे : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आपल्या भाषणात म्हणाले की, 'भारतात येऊन आम्हाला खूप आनंद झाला. हा देश ऑलिम्पिकसह अनेक खेळांमध्ये आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन आयोजित करण्यासाठी भारत एक प्रेरणादायी ठिकाण आहे. गौरवशाली इतिहासासह गतिमान वर्तमान याचा मेळ घालणारा हा देश आहे', असं ते म्हणाले.