मुंबई - मध्यमवर्गाच्या महानतेचे गोडवे गातानाच भाजप कशी मध्यम वर्गाचा सन्मान करते आणि काँग्रेस मात्र कशी मध्यमवर्गाला तुच्छ लेखते हे दाखवून देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आपल्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस या मध्यमवर्गावरच ओझे टाकत आहे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. मोदी यांच्या ४५ मिनिटांच्या भाषणाचा भर मध्यमवर्गावर होता.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बिकेसी मैदानावर आयोजित सभेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यमवर्गाला जोरदार साद घातली. मध्यमवर्गामुळेच भारत विकसित झाला, असे सांगताना काँग्रेस मात्र मध्यमवर्गाला स्वार्थी, लोभी ठरवून त्यांचा अपमान करत आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या न्याय योजनेचा थेट उल्लेख न करता ही योजना राबविण्यासाठी काँग्रेस मध्यम वर्गावरचे ओझे वाढवेल, अशी टीका त्यांनी केली.