मुंबई - विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा उद्या 20 ऑगस्ट रोजी स्मृती दिन आहे. 2013 साली त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. अद्यापही त्यांचे खुनी पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याबाबत अंनिसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र लिहिले आहे.
अंनिसने मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेले पत्र -
मा. मुख्यमंत्री,
आपल्याला माहितच आहे की विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून सात वर्षापूर्वी दि 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला. या दुःखद घटनेला यावर्षी सात वर्ष पुर्ण होत आहेत.
त्यानंतर, डावे विचारवंत आणि राजकीय कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ बंदुकधारी मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शाहू, फुले, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या सारख्या विचारवंतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात खर्च करून महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारात भर घातली आहे. आपण एका बाजुला महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असे म्हणतो आणि दुस-या बाजूला महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांचे खून होतात हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. डॉ. एम. एम. कलबुर्गी हे महात्मा बहवेश्वर यांच्या विचारांचे अभ्यासक आणि संशोधक होते तसेच ते हम्पी विद्यापीठ, कर्नाटकचे कुलगुरू होते. साहित्य अकादमीचा 2006 साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. लिंगायत विचारधारेतील ते एक पुरोगामी विचारवंत होते. तसेच त्यांनी अंधश्रद्धांना विरोध केला होता. त्यामुळेच त्यांची धारवाड येथे 30 ऑगस्ट 2015 रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली.
गौरी लंकेश या कर्नाटकमधील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता होत्या. गौरी लंकेश पत्रिका नावाचे साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. धार्मिक मुलतत्ववादी, अंधश्रद्धा आणि जातिय भेद यांच्या विरोधी त्या सातत्याने लिहीत होत्या. स्त्री चळवळीतसुध्दा त्यांचा सहभाग असे. या कामांसाठी त्यांना आण्णा पालीटकौवस्क पुरस्कार मिळाला होता. त्यांचा सुद्धा 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांचा त्यांच्या घराच्या बाहेर खून करण्यात आला.
आमचा असा ठाम विश्वास आहे की डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना योग्य वेळी अटक होऊन त्यांच्या खुनाचा तपास सूत्रधारापर्यंत पोहचला असता तर त्यानंतर झालेले कॉम्रेड गोविंद पानसरे, डाॕ. प्रा एम एम कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खून झाले नसते. म्हणूनच आम्ही आजुनही तपासात होत असलेली दिरंगाई आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो.
गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास करताना तपास करणाऱ्या एस आय टी ला असे आढळले आहे कि या चार खूनांच्या मध्ये समान धागा असून परस्पर संबंध आहेच पण या खूनांच्या मागचा हेतू समान असून धार्मिक मुलतत्ववादी या कटात आहेत. आमचा असा विश्वास आहे कि या मागील मुख्य धार्मिक मूलतत्त्ववादी सूत्रधारांना पकडण्या मध्ये ऊशीर होत आहे. जे लोक आणि संघटना या खूनांच्या मध्ये गुंतलेले आहेत त्यांना केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अटक करणे आवश्यक आहे यासाठी आणि तपासात निर्णायक गती येण्यासाठी विशेष तपास टीम गठीत करावी लागेल.