मुंबई : Narayan Rane On Manoj Jarange Patil:इस्राईल व पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात शरद पवार यांनी पॅलेस्टाईन लोकांचं समर्थन केलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईलला पाठिंबा घोषित केला असताना शरद पवार यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर भाजपकडून टीका होत आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले व केंद्रात अनेक पद भूषविलेले शरद पवार दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहेत का? १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यावेळेस तेरावा बॉम्बस्फोट मशीदमध्ये झाल्याची खोटी बातमी देऊन दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता का? असे सांगत आता तरी पवार हे तुष्टीकरण सोडून 'देश प्रथम' ही भूमिका घेणार आहेत का? असा प्रश्नही केंद्रीय मंत्री राणे यांनी उपस्थित केला.
जशास तसे उत्तर दिले जाईल :नारायण राणे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी विश्वकर्मा योजना सुरू केली व त्याचे लाखो लाभार्थी आहेत. त्या विश्वकर्मा योजनेबद्दल पवार का बोलत नाहीत? पंतप्रधान मोदी नेहमी शरद पवार यांना गुरूस्थानी मानतात; पण तुम्ही इस्त्राईलची बाजू घेतली नाही. चांगल्याला चांगल म्हणणं हा माणुसकीचा धर्म असून तो तुमच्याकडून अभिप्रेत आहे. म्हणून अशी टीका करू नका, केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशाराही नारायण राणे यांनी शरद पवारांना दिला आहे.
मराठा व कुणबी एकच नाही :सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर बोलताना नारायण राणे म्हणाले की, मराठा व कुणबी एकच नाही. हे अगोदर समजून घ्यायला हवे. यासाठी जरांगे पाटील यांनी घटनेचा अभ्यास करावा. मराठा आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाहीत असे म्हणतात. कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही. ९६ कुळी मराठा वेगळा आहे. म्हणून असे दाखले कुणीही घेणार नाही, असेही राणे म्हणाले. त्याचप्रमाणे ललित पाटील ड्रग्स प्रकरणात कुणालाही सोडले जाणार नाही. दोषींवर कारवाई होणारच, असेही ते म्हणाले.