मुंबई Narayan Rane on Reservation:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन हे प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन संपवलंय. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आपण अभिनंदन करतो. तसंच दिल्लीत नुकत्याच झालेल्या जी 20 परिषदेमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होतं. जगभरातून आलेले प्रतिनिधी या ठिकाणी अत्यंत उत्साहानं सहभागी झाले. सर्वांचं समाधान झालंय. अतिशय नेटकं आणि देखणं नियोजन करून भारतानं जगात स्वतःची मान उंचावलीय. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही आपण अभिनंदन करतो, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.
सरसकट आरक्षण :मराठा आरक्षणासंदर्भात आणि कुणबी जात प्रमाणपत्रा संदर्भात सुरू असलेलं आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर संपुष्टात आलंय. मात्र, राज्यात कुणालाही सरसकट आरक्षण देणं अयोग्य आहे, असं नारायण राणे यांनी यावेळी बोलून दाखवलंय. मराठा समाजालाही आर्थिक आणि सामाजिक मागास निकषांवर आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी यावेळी राणे यांनी केलीय.
कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही :यावेळी बोलताना राणे म्हणाले की, कुणबी हे जात प्रमाणपत्र कोकणात आणि काही ठिकाणी विदर्भात मराठा समाजाला मिळतं. मात्र, सरसकट मराठा समाज हा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. कोणताही मराठा स्वतःची जात कुणबी म्हणून लावून घ्यायला तयार होणार नाही, असा खळबळजनक दावाही राणे यांनी यावेळी केलाय. त्यामुळं कुणबी जात प्रमाणपत्र देण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण द्यावं, असं राणे म्हणाले. घटनेच्या कलम 15/4 प्रमाणं राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार आहे. मात्र, तत्पूर्वी मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे, हे मागास आयोगासमोर सिद्ध करावं लागेल. मागास आयोगाच्या अहवालानुसार केंद्राकडे प्रस्ताव पाठवूनच आरक्षण दिलं जाईल, अन्यथा कोणालाही आरक्षण देण्याचा अधिकार नाही. मग कोणीही कितीही उपोषण केलं तरी त्याला अर्थ नाही, असंही नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. (Narayan Rane on Maratha Reservation)