मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी निर्णयाप्रत आली होती. पण, महाविकास आघाडीच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात नीट वकील देता आला नाही. त्यांना मराठा आरक्षण द्यायचे नव्हते, म्हणूनच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली, अशी घणाघाती टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांनी केली.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्याचे सर्व खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडले. मराठा आरक्षणासाठी चांगला वकील या लोकांनी केला नाही, केवळ नात्यागोत्यातील वकील दिले, असा आरोपही त्यांनी केला.
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवस झालेल्या पावसाळी अधिवेशनावरही नारायण राणे यांनी कडाडून टीका केली. या अधिवेशनात राज्यातील जनतेला दिलासा मिळेल, असा कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही किंवा त्यावर चर्चाही झाली नाही, असे ते म्हणाले. केवळ विधेयके मंजूर करून घेतली. यामुळे सरकारला यापुढे अधिवेशनात घ्यायची नियतीने वेळ दिली तर, ते मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावे, असा टोला राणे यांनी लगावला.
मातोश्रीला दाऊदकडून आलेल्या धमकीबदल राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. त्यांना कोण धमकी देणार, असा सवाल केला. त्यांच्यात धमकी देण्यासारखे आहे काय, अशी टीकाही केली. केवळ सुशांतसिंह प्रकरण हे खून म्हणून उघड होऊ नये, यासाठी हा सर्व खटाटोप चालला आहे आणि त्यामुळेच कंगनावर, तिच्या घरावर कारवाई करणे आदी प्रकार सुरू आहेत, असेही राणे म्हणाले. इतकेच नव्हे तर, उद्धव ठाकरे हे सुशांतसिंह प्रकरणाला घाबरले असल्याचा दावाही त्यांनी केला.