मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या सरकारची स्टेपनी असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री राणेंना प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, अजित पवारांना स्टेपनी हा पुरस्कार वाटला असेल. या पुरस्कारापेक्षा मंत्रीपद मोठे वाटत असल्याचे राणे म्हणाले. त्यामुळेच ते काही बोलत नसल्याचे राणे म्हणाले. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला.
राणेंचा अजित पवारांना टोला
आठवडी बाजारासारखे मंत्री मंत्रालयात येतात -
या सरकारमध्ये एकही मंत्री दररोज मंत्रालयात येत नाही. मंत्री आठवडी बाजारासारखे मंत्रालयात येतात. हे सरकार विकासकामे चालू ठेवण्याऐवजी बंद करण्याचे काम करत असल्याचे राणे म्हणाले.
हा काय बोलणार दाऊदशी -
संजय राऊत म्हणत आहेत की, मी दाऊदशी बोललो. हा काय बोलणार दाऊदशी. तो दाऊदशी बोलला असेल, तर सरकारने त्याची चौकशी करावी असेही राणे म्हणाले. मी शिवसेनेत होतो तेव्हा राऊत काही बोलत नव्हता, मागे मागे असायचा, अन् हा कुठे दाऊदशी बोलेल, मी त्याचा बाप होतो असेही राणे यावेळी म्हणाले. या सरकारने दोन महिन्यात एकही निर्णय घेतला नाही. हे सरकार लोकांसाठी नाही, तर स्वतःचा फायद्यासाठी आहे.
शिवसेनेतील नाराज आमदार माझ्या संपर्कात -
शिवसेनेतील अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचे वक्तव्य नारायण राणेंनी केले. शिवसेनेने फक्त दोन निष्ठावान शिवसैनिकांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. बाकीचे दुसऱ्या पक्षातून आले आहेत. त्यामुळे अनेक आमदार शिवसेनेवर नाराज असून ते माझ्या संपर्कात असल्याचे राणे म्हणाले.