मुंबई : Nanded Hospital Death Case :नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दोन दिवसात 31 रुग्ण दगावल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर अहवाल समोर येईल. मात्र, सद्यस्थितीत या ठिकाणी पुरेसा औषधसाठा आणि डॉक्टर्स, कर्मचारी होते. त्यामुळं यंत्रणेचा दोष दिसत नाही, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde on Nanded Hospital Death Case) यांनी केलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
रुग्णालयातील यंत्रणेचा दोष नाही :ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दोन दिवसात 31 रुग्ण दगावणं ही मोठी गोष्ट आहे. मात्र, या संदर्भात आम्ही सर्व आढावा घेतला आहे. प्राथमिक चौकशी केली असता, रुग्णालयामध्ये सर्व औषधे व्यवस्थित उपलब्ध आहेत. 127 प्रकारची औषधं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्णालयाला बारा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळं निधीचीसुद्धा कमतरता नाही. तसेच पुरेसा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टरसुद्धा रुग्णालयात उपस्थित आहेत. त्यामुळं प्राथमिकदृष्ट्या तरी रुग्णालयातील यंत्रणेचा या घटनेमध्ये दोष दिसत नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.
दुर्घटनेची चौकशी करणार : दरम्यान, नांदेड येथे घडलेल्या या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे प्रत्यक्ष रुग्णालयात भेटीसाठी गेले आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारीही आहेत. या घटनेची चौकशी करण्यात येईल, त्यानंतर चौकशी अंतिम अहवाल समोर येईल. त्यात जर कोणी दोषी आढळलं तर दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.