मुंबई- संसदेचे आगामी विशेष अधिवेशन हे देशाचे तुकडे करणाकरिता आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याकरिता बोलाविण्यात आले. हा आगामी विशेष अधिवेशनाचा अजेंडा असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेम्हणाले की, मोदी सरकारनं 18 ते 22 सप्टेंबरच्या अधिवेशनाचा कोणताही अजेंडा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संसदीय कामकाज समितीसह विरोधी पक्षालाही न विचारता हे अधिवेशन बोलावले आहे. मात्र, नोटाबंदी, मणिपूर हिंसाचार अशा प्रश्नावर कोणतीही विशेष सत्र बोलाविण्यात आलं नव्हतं.
मोदी सरकारला देशाचे विभाजन करून महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळे करायचे आहे. त्यासाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करणे हा अधिवेशनाचा हेतू आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. मुंबई ही देशाची आर्थिक केंद्र असून राज्य व देशाचे भूषण आहे. मात्र, भाजपानं गेल्या नऊ वर्षांपासून मुंबईचे महत्त्व पद्धतशीरपणे कमी करण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न खूप दिवसांपासून सुरू आहे. हिरे उद्योग, ग्लोबल फायनान्शियल सेंटर आणि एअर इंडियाचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले. आता मुंबईपासून वेगळं करण्याच्या कटाचा भाग म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे स्थलांतर करण्याचा प्लॅन असल्याचाही दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलाय.
महाविकास आघाडीच्या काळात भाजपाला महाराष्ट्रापासून मुंबई वेगळं करणं शक्य नव्हतं. त्यामुळेच केंद्र सरकार आणि राज्यपालांच्या मदतीनं महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले. -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले