मुंबई-7 मेचा पदोन्नतीतील आरक्षणाबाबतचा जीआरचा निर्णय घेत असताना काँग्रेस पक्षाला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे या विरोधात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत विषयावर लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पदोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकारला धोरण ठरवणे गरजेचे असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले आहे.
'मुख्यमंत्र्यांची भेट घेणार'
महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर तयार करण्यात आले आहे. मात्र पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत जीआर काढण्यात आला. तो निर्णय किमान समान कार्यक्रम विरोधात घेतला गेला असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून याविषयावर मार्ग काढला जाईल, असेही नाना यांनी सांगितले. पदोन्नती आरक्षण मुद्यावर काँग्रेस आक्रमण असली तरी अद्याप सत्तेतून बाहेर पडण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नाही. या विषयावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षात मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असताना अनेक महत्त्वाचे विषय रेंगाळत ठवल्याने असे प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
हेही वाचा-राहायला जागा नसल्याने महिला रिक्षा टेम्पोमध्येच क्वारंटाईन; गंगापूरमधील घटना