मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्याचे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव चर्चेत असून त्यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्यापही काँग्रेसच्या वरिष्ठांकडून कोणताही शिक्कामोर्तब करण्यात आला नसल्याची माहिती देण्यात आली.
हेही वाचा -अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्यासह दोघांना अटक
मागील महिन्याभरापासून काँग्रेसकडून राज्यात प्रदेशाध्यक्षपद बदलण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्या नावा सोबतच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खासदार राजीव सातव, क्रीडामंत्री सुनील केदार आदींच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यामध्ये दिल्लीतील काँग्रेस नेत्यांमध्ये नाना पटोले यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याची माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे कोणत्याही क्षणी राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा काँग्रेसकडून केली जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद पृथ्वीराज चव्हाणांकडे जाण्याची शक्यता
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर नाना पटोले यांना मंत्रिमंडळात संधी न देता काँग्रेसकडून त्यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यावर पटोले हे नाराज असल्याने त्यांच्यावर राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून त्यांची ही नाराजी दूर केली जाण्याचा प्रयत्नही काँग्रेसकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षपद हे त्यांना सोडावे लागणार आहे. त्यामुळे, त्यांच्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात कोणतेही स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे, एकाच वेळी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांना संधी देऊन काँग्रेसकडून दोन्ही नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
ओबीसींना जवळ करण्याचा प्रयत्न?
काँग्रेसमध्ये नाना पटोले हे ओबीसीचा चेहरा म्हणून ओळखले जातात. तर, दुसरीकडे काँग्रेसच्या आक्रमक नेत्यांमध्ये पटोले यांचे नाव आघाडीवर असते. मागील काही वर्षात राज्यामध्ये काँग्रेसला आलेली मरगळ झटकून काढून काँग्रेसला पुन्हा एकदा जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे काम पटोले यांच्या माध्यमातून केले जाईल, असा विश्वासही काँग्रेसला वाटतो. शिवाय राज्यात ओबीसीचा एक मोठा वर्ग असून हा वर्ग पुन्हा एकदा आपला करण्यामध्ये काँग्रेसला यश येईल, यामुळेच पटोले यांच्या नावाची दिल्लीत सर्वाधिक पसंती असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा -राणा दग्गुबत्तीनिर्मित ‘मिशन फ्रंटलाईन‘ मधून बीएसएफ जवानांचा दृढनिश्चय व शौर्याला मानवंदना!