मुंबईNawab Malik :नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळं या अधिवेशनात अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिक यांना सत्तेत सामावून न घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आज अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.
नवाब मलिक प्रकणावरुन मनसेची टीका : नवाब मलिक प्रकणात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत महायुती सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहलंय की, इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं ? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड ? 'नवाब'चा 'जवाब' द्या कि नका देऊ पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या 'नकाब'चा 'जवाब' मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल, नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल !
मलिकांच्या भूमिकेनंतर भूमिका मांडणार :नवाब मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर 'मी' माझी अधिकृत भूमिका तसंच पक्षाची भूमिका मांडणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर द्यायचं की नाही, हे मीडियानं मला सांगण्याची गरज नाही, असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. नवाब मलिक यांना सभागृहात कुठं बसायचं याचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
माझा कोणाशीही संबंध नाही :राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा महायुतीत समावेश करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना पत्र लिहून प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत देखील अशीच भावाना आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर उत्तर देताना अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला शरद पवार यांनी आधीच उत्तर दिलं आहे. तसंच माझे कोणाशीही संबंध नसल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला आहे. आम्ही त्यांचा आमच्या गटात समावेश केलेला नाही. त्यांच्या समर्थनाचं कोणतेही प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडं आम्ही सादर केलेलं नाही. त्यामुळं नवाब मलिक यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं पटेल यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्राचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही, असं पटेल म्हणाले.
मालिकांनी केला होता फडणवीसांवर आरोप :तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी दोन वर्षांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तत्कालीन फडणवीस सरकारनं बनावट नोटा चालवणाला आश्रय दिला होता, असा आरोप मलिक यांनी केला होता. तसंच फडणवीस यांचे अंडरवर्ल्ड डॉन रियाझ भाटीशी जवळ संबंध असल्याचं म्हटलं होतं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना फडणवीसांनी महत्वाच्या पदावर नियुक्त केल्याचा आरोप देखील मलिक यांनी केला होता.
काँग्रेसचा हल्लाबोल :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नौटंकी करत आहेत. प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिरचीशी संबंध आहेत. ईडीनं त्यांची संपत्ती देखील जप्त केली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी घोटाळ्याचा आरोप अजित पवार यांच्यावर केला होता. त्यांना भाजपानं मांडीवर बसवलंय, मात्र मलिकांबाबत भाजपाची वेगळी भूमीका का असा सवाल त्यांनी केला आहे. तर, दुसरीकडं बाळासाहेब थोरात यांनी यांनी फडणवीसांवर निशाना साधला आहे. सत्ता येते जाते असं फडणवीस कसं म्हणू शकतात, त्यांनी सत्तेसाठी सर्व काही केलं, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असा हा प्रकार आहे, असं थोरात म्हणाले.
मलिकांना फडणवीसांचा विरोध का ? :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक चालत नाही. मात्र, त्यांना प्रफुल्ल पटेल कसे चालतात, असा सवाल विरोधकांनी केल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे. यावर राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धर्माच्या मुद्द्यावरून महायुतीत सामील होण्यास मलिकांना विरोध असेल. मात्र, मलिकांबाबत खरं कारण वेगळं आहे. कोणताही सामान्य माणूस सर्वकाही सहन करतो, परंतु त्याच्या कुटुंबावर झालेले आरोप तो कधीच सहन करत नाही. तत्कालीन मंत्री नवा मलिक यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. तसंच त्यांनी भाजपावर देखील अनेक आरोप आहेत. अमृत देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमाला दाऊदच्या माणसानं आर्थिक मदत केल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्यामुळं फडणवीसांना भयंकर त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर मलिक फडणवीसांच्या रडारावर होते. जोपर्यंत नवाब मलिक निर्दोष सुटत नाही, तोपर्यंत फडणवीस मलिकांना सत्तेत समावेश करणार नसल्याचं भावसार यांनी म्हटलंय आहे.
हेही वाचा -
- मलिकांमुळं अजित पवारांची कोंडी, नवाब मलिक कोणाच्या गटात? अजित पवार यांचे कानावर हात
- केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कांद्याच्या दरात 1 हजार रुपयांनी घसरण
- मनोज जरांगे पाटलांना जोरदार धक्का, आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यास गृहमंत्री फडणवीसांचा नकार