मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ज्या अॅक्सिस बँकेत नोकरीला होत्या. त्या अॅक्सिस बँकेत 2017 मध्ये पोलिसांचे आर्थिक व्यवहार झाले. त्यामध्ये गैरव्यवहार झाले आहेत. या सर्व गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, म्हणून आम्ही न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली होती. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे न्यायालयाच्या लक्षात आल्याने सुमोटो देत न्यायालयाने जनहित याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज मुंबईत केली.
हेही वाचा -'शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला'
मुख्यमंत्री फडणवीस हे एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, अॅक्सिस बँकेसाठी 2005 मध्ये जीआर काढला. परंतु, त्यात इतरही बँका होत्या. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बँकेच्या उपाध्यक्षा कशा झाल्या? यात नेमके काय व्यवहार झाले? यासाठी आम्ही न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सुमोटो देत जनहित याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, आणि याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.
मुख्यमंत्री हे स्वतःला क्लीन मुख्यमंत्री म्हणतात. मग यात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी, असेही पटोले म्हणाले. मुख्यमंत्री, बेरोजगार आणि महिलांवरील अत्याचार हे विषय मुद्दाम काढत नाहीत. त्यांना जनतेची चिंता नाही, यामुळे त्यांनी राज्यात निवडणुकीसाठी 370 चा आधार घेतला आहे.