मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर तेलंगाणा राज्यातील बीआरएस पक्षाचा कोणताही परिणाम होणार नसून, बीआरएस पक्ष भारतीय जनता पार्टीची बी टीम असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला ठाऊक असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. बीआरएस पक्षांमधील अनेक नेते सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगाणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा असून लवकरच तेलंगाणा पॅटर्नची पोलखोल करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
काँग्रेसचे सरकार यावे ही वारकऱ्यांची अपेक्षा :भारत राष्ट्र समिती हा पक्ष राज्यातील राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही. काँग्रेस विचाराचेच सरकार यावे ही वारकरी व जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल. तेलंगाणात नऊ वर्ष केसीआर यांनी जनतेची कोणतीही कामे केली नाहीत. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांसाठी भरीव काम केले नाही. फक्त मोठ-मोठ्या जाहीराती देऊन काम केल्याचा डांगोरा बीआरएस पक्ष पिटत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला .
वारीवरून राजकारण करणे कितपत योग्य :पंढरपूर आषाढीवारी वरून राजकारण करू नये. हैदराबादहून तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर 600 गाड्यांचा ताफा घेऊन येत आहेत. पंढरपुरात आषाढी वारीला 10 लाख वारकरी जमतात, त्यात केसीआर यांनी बाहेरुन आणखी लोक आणून गर्दी करायची हे कितपत योग्य आहे, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. पंढरपूरचा विठोबा हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे. त्याचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.