मुंबई : महाराष्ट्रात रस्ते व चौक यांचे नामकरणावरून वाद काही नवीन नाहीत. विविध ठिकाणी कोणत्या ना कोणत्या नावावरून संघर्ष सुरू असतो. रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानक, पूल, चौक, विद्यापीठे, रस्ते महामार्ग आदीच्या नामकरणासाठी राजकीय मंडळी जोर लावतात. राज्य महामार्गावरील वाहतुकीची समस्या, विकासापुढे रस्त्यांपेक्षा नामकरणाचा मुद्दा गौण ठरतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे ते वर्सोवा सिलिंक या 17 किलोमीटरच्या महामार्गाला वीर सावरकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. सरकारच्या या नामांतराला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे.
मुंबई - पुणे महामार्गाचा वाद - महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई ते सांस्कृतिक राजधानी समजली जाणाऱ्या पुण्याला जोडण्यासाठी मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग तयार करण्यात आला. निर्णय तत्कालीन राज्य सरकारने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. युतीत असलेल्या शिवसेना आणि भाजपने त्यावेळी या नामकरणाला कडाडून विरोध करत साहित्यसम्राट पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यामुळे एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटले होते.
समृद्धी द्रुतगती महामार्ग-यापूर्वी ठाकरे गटाने समृद्धी महामार्गाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.. भाजपने या नामांतराला विरोध करत दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, असे नामांतर या महामार्गाचे करण्यात आले. समृद्धी महामार्ग ही बाळासाहेबांची संकल्पना होती. गेमचेंजर ठरणाऱ्या महामार्गाला यामुळे बाळासाहेबांचे नाव देण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन सेना नेत्यांमध्ये यावेळी जोरदार शाब्दिक वाद झाले होते.
- वरळी - वांद्रे सी लिंकमुंबईतील वरळी - वांद्रे सी लिंकला जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले. या महामार्गाला वीर सावरकर यांचे नाव द्यावे अशी मागणी भाजपने केली होती. मात्र तत्कालीन सरकारने राजीव गांधी यांचे नाव दिले. या निर्णयाला तत्कालीन युतीत असलेली शिवसेना आणि भाजपने कडाडून विरोध केला होता.
- प्रस्तावित कोस्टल रोड- मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोस्टर रोडला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडचे नाव दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिले आहे.