महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नायरमधील डॉक्टरांना पुन्हा कोरोना की पोस्ट कोविड? लवकरच निदान होण्याची शक्यता

इंटर्न डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर मार्चपासून कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. हे डॉक्टर थेट रुग्णाच्या संपर्कात येत असल्याने ते हाय रिस्कमध्ये येतात. यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यानुसार मोठ्या संख्येने पालिका-सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनाची लागण होत आहे.

nayar hospital (file photo)
नायर रुग्णालय, मुंबई (संग्रहित)

By

Published : Sep 8, 2020, 3:26 PM IST

मुंबई - देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाची लाट ओसरली नसताना आता कोरोना झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. यात मुंबईकरांचीही चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. आता मुंबईतील कोरोना योद्धे असलेल्या डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे डॉक्टर नायर रुग्णालयातील आहेत. मात्र, या डॉक्टरांना कोरोनाची पुन्हा लागण झाल्याच्या वृत्ताला रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी नकार दिला आहे. तर त्यांना पोस्ट कोविडची लक्षणे असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे का? की हा पोस्ट कोविड आजार आहे? याची विशिष्ट तपासणी-अभ्यास सुरू आहे. याबाबत लवकरच माहिती समोर येईल, असेही डॉ. भारमल यांनी सांगितले.

इंटर्न डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर मार्चपासून कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. हे डॉक्टर थेट रुग्णाच्या संपर्कात येत असल्याने ते हाय रिस्कमध्ये येतात. यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यानुसार मोठ्या संख्येने पालिका-सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनाची लागण होत आहे. तर कोरोनातुन बरे झालेले डॉक्टर्स पुन्हा रुग्णसेवा देत आहेत. अशात नायर रुग्णालयातील अंदाजे पाच डॉक्टरांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने ते पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. या डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे, असे वाटत नाही. तसे काही असेल तर यासाठीची विशेष तपासणी केल्याशिवाय काही सांगता येणार नाही. मात्र, याला कोरोनाचा पुर्नसंसर्ग म्हणणे मोठी गोष्ट ठरेल, असे डॉ. भारमल यांनी सांगितले. पण त्यांना पोस्ट कोविडचा आजार असण्याची शक्यता आहे. त्यानुसार या दोन्ही दृष्टीने अभ्यास आणि तपासणी सुरू आहे. त्यामुळे यासंबंधीचा अहवाल आल्यानंतरच नेमके काय ते स्पष्ट होईल असेही, डॉ. भारमल यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० कोटा अखेर रद्द; मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे म्हटले आहे. तर पोस्ट कोविड आजारही बळावत आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांनी आणखी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे डॉक्टर सांगत आहेत. यासोबत मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा मुंबईतील परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details