मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई ( Ramai Ambedkar ) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रसुतिगृहाच्या नामकरणासोबतच आधुनिकीकरणाचा विषयसुद्धा आमच्या अजेंडामध्ये असून येत्या पाच वर्षात आम्ही प्रसूतिगृहाचे अत्याधुनिक सोयी सुविधेसह आधुनिकीकरण करू, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. B. R. Ambedkar ) यांनी समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ भेदाभेद नष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांचा हा सिद्धांत पुढे नेऊन सामाजिक विकास साधायचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister Ramdas Athawale ) यांनी केले.
संविधानाच्या रूपाने उपकार -
नायगाव येथील प्रसूतिगृहाचे 'त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर प्रसूतिगृह' असा नामकरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते १५ फेब्रुवारीला करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अनेक वेदना सहन केल्यानंतर सांभाळणारी आई माझी माता रमाई आहे. माता रमाईला आम्ही कधीही विसरू शकणार नाही. मुंबई महानगरपालिकेने नामकरणाचा चांगला निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगून महानगरपालिकेचे आभार मानले.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, हा कार्यक्रम आगळा-वेगळा असून या प्रसूतिगृहाला चांगले नाव दिले आहे. संविधानाच्या रूपाने आम्हा सर्वांवर बाबासाहेबांचे अनंत उपकार असून संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेबांच्या उल्लेखनीय कामांची नोंद आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. आंबेडकरांमुळे महिलांना प्रसूती रजा मंजूर झाली. ग्रंथ कमी पडतील इतके उत्तुंग काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. मला सोन्याचे दागिने नको, कुंकू हेच माझे दागिने आहे, असा अमूल्य विचार माता रमाई यांचा असल्याचे महापौरांनी नमूद केले.