मुंबई- कोरोना व्हायरसपासून बचावाचे पहिले शस्त्र म्हणजे मास्क आहे. परंतु, हा मास्क कसा आणि कोणत्या प्रकारचा असावा हे माहिती असेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण व्हॉल्वअसलेले एन 95 मास्क कोरोना संसर्ग रोखण्यात अयशस्वी झाला असल्याचा दावा काही डाॅक्टरांनी केला आहे. दिसण्यासाठी आकर्शक असणारा हा मास्क नागरिकांना खरेदी करताना अधिक भावतो. त्यामुळे सर्रास त्याची खरेदी केली जाते. मात्र, हा मास्क वापरणे धोक्याचे असून त्याचा वापर तत्काळ बंद करावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केले आहे.
एन 95 मास्क, थ्री लेअर सर्जिकल मास्क, एन 95 व्हॉल्व मास्क, कॉटन मास्क असे अनेक प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. एन 95 मास्क आणि एन 95 व्हॉल्व मास्क हे डॉक्टर तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरावे, असा अलिखित नियम आहे. मात्र सुरुवातीपासूनच हे मास्क सर्वसामान्यही वापरताना दिसत आहेत. मिशन बिगिन अगेन नंतर आता मोठ्या संख्येने लोक बाहेर पडत असल्याने व्हॉल्व मास्कही अधिक वापरला जात आहे. मात्र हाच मास्क आता इतरांसाठी धोक्याचा ठरत आहे. या मास्कमुळे बाहेरचे जंतू आत येत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. पण या मास्कमधून मास्क वापरणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील जंतू मात्र बाहेर फेकले जातात. अशावेळी जर व्हॉल्व मास्क वापरणारी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता वाढते, असे डॉ.अनिल पाचणेकर यांनी सांगितले.
आम्ही कोरोनाच्या काळात अगदी सुरुवातीपासून एन 95 व्हॉल्व मास्क वापरू नका, ते केवळ डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच आहेत, असे आवाहन करत आहोत. मात्र त्यानंतरही या मास्कचा वापर वाढताना दिसत आहे. दरम्यान केंद्र सरकारनेही महिन्याभरापूर्वीच सर्वसामान्यांना हा मास्क वापरण्यास बंदी केली आहे. पण तरीही हा मास्क वापरला जात आहे. हा मास्क आतले जंतू बाहेर फेकत असल्याने जर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा मास्क वापरत असेल तर त्याच्या शिंकण्यातून, खोकण्यातून कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे हा मास्क वापरणे धोक्याचे आहे, असे आयएमए, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.