मुंबई -जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका सज्ज आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नसला तरी खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी काय करावे, काय करू नये याची माहिती जाहिरातींच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार आहे. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून वापरले जाणारे एन-९५ मास्क डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विकू नये, असे आदेश सर्व मेडिकल दुकानांना देण्यात आल्याची माहिती नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मार्गदर्शक सुचनांचे योग्य पालन करावे, असे आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सभागृहात तनपुरे यांनी शुक्रवारी दुपारी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना अतिशय चांगल्यारितीने केल्या आहेत. महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. विलगीकरण कक्षांमध्ये गरज पडल्यास वाढ करण्याची तयारी आहे.