मुंबई -आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणे नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत, ती दुर्दैवी आहेत. सरकार फक्त युती टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत आहे, असा नाराजीचा सूर आळवत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया दिली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा -खुशखबर.. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार वाहन चालविण्याचा परवाना
धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा
वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला खरा, पण सदर प्रकरणात राजीनामा देण्यात दिरंगाई झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा, असे वाटते का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
जी भाजपची भूमिका आहे, तीच माझी भूमिका
धंनजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात जी भाजपची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे. त्यांनी स्वतःचे दायित्व ठेवून सत्य आणि असत्य करण्याची शक्ती असेल, तर त्यांनी देखील राजीनामा देण्याचा निर्णय घ्यायला हवा. त्यांच्यामुळे जर पक्षाला त्रास होणार असेल व चुकीचे उदाहरण निर्माण होत असेल, तर हा निर्णय घ्यायला हवा. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही, असे भाष्य पंकजा मुंडे यांनी केले.
हेही वाचा -मुंबई : वरळीतील पब, बारवर होणार कारवाई - मंत्री अस्लम शेख