मुंबई - माझ्या विचारांशी द्रोह केलेल्यांसोबत माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे यापुढे माझा फोटो वापरताना माझी परवानगी घेणे गरजेचे असल्याचे ऑफ द रेकॉर्ड बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.
शरद पवारांची तंबी : मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये, अशी थेट तंबीच शरद पवार यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना दिली आहे. त्यामुळे आता बंड केलेल्या नेत्यांना शरद पवार यांचा फोटो वापरता येणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. तरीही अजित पवार आणि त्यांचे बंड केलेले सहकारी शरद पवार यांचा फोटो वापरणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नवीन कार्यालयात शरद पवारांचा फोटो - राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाचे मुंबईत कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले. या कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतरच शरद पवार यांनी आपला फोटो वापरण्याबाबत तंबी दिली असल्याचे बोलले जात आहे.